प्रत्येकालाच शरीराच्या अवयवांसंबंधी वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. हिवाळ्यात अनेकदा कान दुखण्याची समस्या जाणवते. अनेकदा कानांना जास्त हवा लागत असल्यामुळे किंवा सर्दी झाली असल्यास हा त्रास उद्भवतो. काहीवेळा हे दुखणे तीव्र स्वरूपाचे असते. वेदना असह्य होत असतात. कानाच्या पडद्याला जर जखम झाली असेल किंवा छिद्र पडले असेल तर कानात आवाज येतो. कान जड झाल्यासारखा वाटणे, कानाची मागची बाजू दुखणे अशा समस्या उद्भवत असतात. अशी परिस्थिती जर तुमच्या बाबतीत सुध्दा उद्भवत असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही कांनांच्या दुखण्यापासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत खास घरगुती उपाय.
कानात मळ तयार होणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही पेनकिलर घेता पण सारखी सारखी पेनकिलर घेण्यापेक्षा जर तुम्ही घरगुती उपायांचा वापर केला तर कान दुखण्याची समस्या दूर होऊ शकते. त्याचप्रमाणे या उपायांच्या वापराने समस्या उद्भवण्यापासून तुम्ही वाचू शकता.
जर तुमच्याकडे कोणताही कानात घालण्याचा ड्रॉप असेल तर चांगली गोष्ट आहे. पण जर नसेल तर तुम्ही हातांवर थोडंसं तेल घेऊन कानांच्या आजुबाजूला मसाज करू शकता. त्यामुळे कानांच्या आजुबाजूच्या नसांना आराम मिळेल. जर तुम्हाला मागच्या बाजूला दुखत असेल तर तुम्ही मागच्या बाजूने मसाज करू शकता.
कान शेकणे
जर तुमचा कान दुखत असेल तर ईअरबडचा वापर करणं खूप घातक ठरू शकतं. जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर हॉट पॅडच्या सहाय्याने तुम्ही कानांना शेकल्यास आराम मिळेल. पण तुमच्या घरी हॉटपॅड नसेल तर तुम्ही घरात असलेला तवा गरम करून त्या तव्यावर एखादा कपडा घालून त्या कपड्याने शेकल्यास कानांसाठी फायदेशीर ठरेल. शेकत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही २० मिनिटांपेक्षा जास्त शेकू नका. तसंच शेकण्यासाठी असलेला कपडा जास्त गरम असू नये.
कानात तेल घालणे
अनेकदा कान कोरडे पडत असतात. त्यामुळे कान दुखण्याची समस्या जाणवते. जर तुम्हाला सुध्दा ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही आठवड्यातुन एकदा कानात तेल घातल्यास कान कोरडे पडणार नाहीत. ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.