देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तसेच, कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे. एकंदरित पाहता आता कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. पर्यटनाला पुन्हा चालना मिळू लागली आहे, सगळीकडे एकंदर आनंदाचे वातावरण असून परिस्थितीपासून काहीसा दिलासा मिळत आहे, हे चित्र पाहता खऱ्या अर्थाने सणाची धामधूम सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे यंदाची दिवाळी अत्यंत उत्साहाची असणार आहे, अशी अपेक्षा आहे.
दिवाळी हा देशातला सर्वात मोठा सण आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोरोनामुळे गेल्या वर्षी निर्माण झालेला ताण आणि रुग्णांची व मृत्यूंची संख्या या पार्श्वभूमीवर यंदा सगळे जण दिवाळी धडाक्यात साजरी करतील, यात शंका नाही. नेत्रचिकित्सकांसाठी दिवाळी हा अतिशय व्यस्त आणि तणावाचा काळ असतो. स्वयंपाकघरांमध्ये सतत लगबग सुरू असते, दिवे, रोषणाई केली जाते आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. यामुळे संकटाला आमंत्रण मिळू शकते. सणाचा आनंद साजरा करण्याला माझा विरोध नक्कीच नाही, परंतु वाचकांनी साजरीकरणाबरोबरच काही काळजीही घेतली पाहिजे. दिवाळीमध्ये शरीरावर कुठेतरी भाजले जाणे स्वाभाविक असते आणि ही दुखापत सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या भाजण्याच्या जखमा अशी असू शकते. डोळ्यांना कशा प्रकारे दुखापत होऊ शकते आणि त्या टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याकडे एक नेत्रचिकित्सक म्हणून मला लक्ष वेधावेसे वाटते.
दुखापत होण्याची शक्यता असल्यास डोळे मिटून घेण्याची उपजत यंत्रणा आपल्या शरीरामध्ये आहे. परंतु, काही वेळा ती पुरेशी नसते. डोळ्यांची रचना पाहता, कॉर्निया हा डोळ्यांचा सर्वात बाहेरचा भाग पारदर्शक असतो आणि त्याच्यातून प्रकाश डोळ्यामध्ये येतो व दृष्टीही मिळते. हा भाग एखाद्या काचेसारखा दिसतो. त्याला कोणताही दुखापत झाली तर त्यावर कायमस्वरूपी व्रण उठतात आणि दृष्टी क्षीण होते. डोळ्याची रचना गोलाकार असते. त्यामध्ये मुळातच असलेल्या दाबामुळे डोळ्याचा आकार कायम राखला जातो. या भागात कोणतीही दुखापत झाली आणि फटाके अगदी जवळून पाहिले तर तिथल्या ऊती खराब होतात आणि अनेकदा त्यांच्यावर उपचार करणे अवघड ठरते.
दिव्यातले गरम तेल डोळ्यात जाऊ शकते किंवा स्वयंपाक करत असताना तेल डोळ्यात उडू शकते. यामुळे डोळ्यांच्या सर्वात वरच्या स्तरांना वेदना, त्रास होतो, सदोष वायरिंग व दिवे यामुळे इलेक्ट्रिकल बर्न दुखापत होऊन थर्मल बर्न दुखापत होऊ शकते. या सर्वांमध्ये, फटाक्यांमुळे सर्वाधिक नुकसान होऊ शकते. फटाक्यांमुळे होणारे परिणाम हे स्फोटामुळे होणाऱ्या दुखापतींसारखे असतात. त्यांचे प्रमाण मात्र स्फोटापेक्षा कमी असते. डोळ्यांना होणारी दुखापत बाहेरचे घटक डोळ्यात जाणे असी सौम्य दुखापत ते तीव्र स्वरूपाची दुखापत असू शकते व त्यासाठी तातडीने शस्त्रक्रियेची गरज असू शकते.
पुढील प्रथमोपचार करू शकता - गरम तेल किंवा बाहेरचे घटक डोळ्यात जाणे अशा सौम्य त्रासाच्या बाबतीत पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात डोळ्यावर मारून डोळा पूर्णपणे स्वच्छ धुवावा, किंवा कपभर पाणी डोळ्याच्या जवळ ओतत राहा आणि डोळ्यांची सतत उघडझाप करा. डोळ्यात गेलेले बाहेरचे घटक काढून टाकण्यासाठी आणि योग्य औषधे समजून घेण्यासाठी नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या. फटाक्यांमुळे डोळ्यांवर थेट परिणाम होऊन प्रचंड रक्तस्राव होत असेल तर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा, डोळ्यावर कापूस किंवा टॉवेल ठेवा, अजिबात दाब देऊ नका. शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते, त्यामुळे तातडीने नेत्रचिकित्सकांशी संपर्क करा.
पुढील सावधगिरी बाळगा -- स्वयंपाक करताना संरक्षक आयवेअर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा आणि भांडी कमरेच्या पातळीच्या वर ठेवा. - फटाके फोडत असताना ते पेटवल्यावर योग्य अंतर राखा, फेस शिल्ड वापरा, कोविडमुळे फेस शिल्ड आता सहज उपलब्ध आहे. - जळते फटाके हातात घेऊ नका किंवा हवेत उडवू नका.- फटाक्यांच्या आजूबाजूला लहान मुले वावरत असल्यास मोठ्या माणसांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - नेहमी पाण्याची बादली जवळ ठेवा.- मोटरचालकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच रस्त्यावर अनेक लोक फटाके उडवत असल्याने हेल्मेट घालावे.- स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका किंवा घरात उपलब्ध असलेले ड्रॉप वापरू नका, योग्य प्रथमोपचार करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
‘उपचारापेक्षा प्रतिबंध योग्य’, असे म्हणतात. त्यानुसार सावधगिरी बाळगणे आणि असे प्रसंग टाळणे योग्य ठरेल. तुम्हाला सर्वांना भरपूर आरोग्य, धन आणि आनंद मिळो, या सदिच्छा! तुम्हाला सर्वांना आनंदी व सुरक्षित दिवाळीच्या शुभेच्छा!
(लेखक : डॉ. सत्यप्रसाद बाल्की, कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्स )