- डॉ. वर्षा खत्री
Diabetes : बहुतांश लोकांना वाटते की मधुमेहाचे प्रत्येक रुग्णावर एकसारखेच परिणाम होतात आणि सगळ्यांसाठी उपचारही एकसारखेच असतात. मात्र, सत्य हे आहे की मधुमेह असलेली प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्या व्यक्तीला उपचार देताना विविध पातळ्यांवर वेगळा दृष्टिकोन अंगिकारावा लागतो. यामागील एक कारण म्हणजे मधुमेह हा ‘जीवनशैलीचा आजार’ आहे आणि रक्तातील शर्करा पातळी संबंधित व्यक्तीच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. यात आहार, सक्रिय असण्याचे प्रमाण, ताण आणि झोप अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
बहुतांश डायबिटॉलॉजिस्ट मधुमेहावर उपचार सुचवताना प्रचलित उपचार पद्धतीचा वापर करतात. मात्र, त्याचसोबत ते रुग्णाच्या सवयी, गरजा आणि आवश्यकता यांचाही विचार करतात. त्यामुळे ‘पर्सनलाइज्ड’ म्हणजेच वैयक्तिक स्वरुपाचे उपचार देणे शक्य होते. यात थेरपीचा सल्ला, जीवनशैलीतील बदल, नियमितपणे रक्तातील शर्करेचे प्रमाण नोंदवणे आणि डॉक्टरांच्या भेटी वेळापत्रक अशा गोष्टींचा विचार केला जातो. रुग्ण किती मेहनतीने या साऱ्या गोष्टी करेल त्यावर यश अवलंबून असते.
हे जरा गुंतागुंतीचे, गोंधळाचे वाटतेय का? टेन्शन नका घेऊ. तुम्ही स्वत:च तुमच्या मधुमेहाचे नियंत्रण हाती घेतलेत तर हे सारे काही फार सोपे होईल. त्यासाठी तुम्हाला फक्त S.E.L.F. ला महत्त्व द्यायचे आहे. कसे ते पाहूया…
S: स्ट्रक्चर्ड सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज
रक्तातील शर्करा पातळी मोजण्यासाठी आणि त्याची नोंद करण्यासाठी नियमित वेळापत्रक आखा. साधारणपणे सकाळी उठल्यानंतर लगेच आणि दुपारच्या जेवणानंतर दोन तासांनी हे प्रमाण मोजले जाते. मात्र या पद्धतीबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. कारण, प्रत्येकाचा मधुमेह वेगळा असतो आणि कदाचित तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी अधिक वैयक्तिक स्वरुपावर देखरेखीची पद्धत सुचवतील.
दररोज ठराविक वेळेला तुमच्या रक्तातील शर्करा प्रमाण मोजण्यासाठी आयएसओ प्रमाणित ग्लुकोमीटर वापरा. आधुनिक पद्धतीचे ग्लुकोमीटर तुमच्या मोबाइललाही कनेक्ट होतात आणि ब्लूटूथचा वापर करून ही सगळी नोंद अगदी सहज अॅपमध्ये घेता येते. अॅपमध्ये या शर्करा प्रमाणाची माहिती नोंदवली जाते आणि त्यातून विश्लेषणही केले जाते. यातून तुम्हाला प्रमाण कमी-जास्त होण्याचे ट्रेंड्स कळतात आणि त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या डायबिटालॉजिस्टना तुमचे सध्याचे उपचार, आहार आणि व्यायाम योग्य रितीने सुरू आहे का, त्यातून तुमच्या रक्तातील शर्करा प्रमाणावर नियंत्रण राहत आहे का हे तपासता येईल. तसे नसल्यास, तुमच्या सध्याच्या मधुमेह व्यवस्थापन आराखड्यात डायबिटालॉजिस्ट योग्य बदल करू शकतील.
E: एक्सरसाइज
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या शिफारशींनुसार मधुमेह असलेल्या रुग्णांनी दर आठवड्याला १५० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ व्यायाम करायला हवा आणि त्यात एरोबिक्स आणि रेसिस्टन्स ट्रेनिंग असा दोहोंचा समावेश असावा. हा व्यायाम तुम्ही आठवड्यातून कोणतेही तीन दिवस करू शकता. मात्र, व्यायामात दोन दिवसांपेक्षा अधिक विश्रांती घेऊ नये. व्यायामाचा वेळ आणि प्रकार नोंदवून ते तुमच्या डायबिटालॉजिस्टनाही सांगा. रक्तातील शर्करा प्रमाण नोंदवणारे काही अॅप्स तुमच्या शारीरिक सक्रियतेमुळे शर्करा प्रमाणावर किती फरक पडला हेसुद्धा नोंदवतात आणि तुमच्यासाठी सर्वाधिक परिणामकारक ठरणारा व्यायामप्रकार तसेच कालावधी यासंदर्भातील विश्लेषणही पुरवतात. मात्र, कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणे योग्य राहील.
L: लो, गुड क्वॉलिटी कॅलरी इनटेक
कॅलरी म्हणजे तुमच्या आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण. इथे एक महत्त्वाची बाब समजून घ्यायला हवी की कॅलरीजचे ‘प्रमाण’ आणि ’दर्जा’ अशा दोन्ही गोष्टींचा रक्तातील शर्करा प्रमाणावर परिणाम होत असतो. कॉम्पलेक्स कार्ब्स, प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स हे ‘गुड कॅलरीज’ म्हणजेच आरोग्यदायी मानले जाते. तर, सिंपल कार्ब्स आणि अनारोग्यकारक फॅट्समधून मिळणाऱ्या कॅलरीज ‘बॅड कॅलरीज’ असतात. मधुमेह रुग्णांनी आपण किती कॅलरीज घेतल्या आणि त्याचा मूळ स्रोत काय याची नोंद ठेवायला हवी. शिवाय हे नियमितपणे आणि प्रत्येक खाण्यानंतर करायला हवे. तुमच्या कॅलरीज मोजण्यात साह्य करणारे आणि विविध पदार्थांचा तुमच्या रक्तातील शर्करा प्रमाणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणारे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. चांगल्या आणि वाईट कॅलरीजबद्दल तुमच्या डायबिटालॉजिस्ट किंवा आहारतज्ज्ञांकडून नीट माहिती घ्या. तसेच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आरोग्यदायी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा, हेसुद्धा समजून घ्या.
F: फॉलो अप, नियमितपणे
मधुमेहाच्या रुग्णांसाठी डॉक्टरांच्या नियमित भेटी म्हणजेच फॉलो अप्स फार महत्त्वाचे असतात. उपचारांमध्ये कायमच सातत्य टिकवायला हवे. तुमच्या रक्तातील शर्करा प्रमाण नियंत्रणात असले ती डायबिटॉलॉजिस्टना नियमित भेटणे आवश्यक आहे. मधुमेहात डॉक्टरांना तुमचे हृदय आणि मूत्राशय यावर तसेच इतर गुंतागुंत होत नाहीए याकडेही लक्ष द्यावे लागते. नियमितपणे भेट घेतल्यास या मुद्द्यांवर त्यांना लक्ष देता येते आणि आवश्यकता वाटल्यास उपचारांमध्ये बदल करता येतात. मधुमेह हा एक गंभीर आणि चिवट आजार आहे. मधुमेहाच्या या लढाईत तुमचे डायबिटालॉजिस्ट आणि आहारतज्ज्ञ हे तुमचे जवळचे मार्गदर्शक असणार आहेत. त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळापत्रकानुसार भेटा आणि त्यांचे सल्ले अमलात आणून नियमित मार्गदर्शन घ्या.
लेखिका रोश डायबिटीज केअर इंडियामध्ये मेडिकल अॅण्ड सायंटिफिक अफेअर्स विभाग प्रमुख आहेत