White Hair: आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातही अनेकांचे केस पांढरे होतात. लोक वेगवेगळे उपाय करून केस काळे करण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांना फायदा मिळतोच असं नाही. केमिकल असलेले हेअर डाय लावले तर केस आणखी खराब होतात. अशात आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून केस नैसर्गिक पद्धतीने काळे होतात. या उपायांचा प्रभाव हळूहळू दिसतो, पण केस मुळापासून काळे होतात.
मोहरीचं तेल - जर योग्यपणे वापर केला तर मोहरीच्या तेलाने केसांचा रंग गडद होतो. या तेलामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात. जे मेलानिनचं प्रमाण वाढवतात. मेलानिनमुळे केसांचा रंग आणखी डार्क होतो. मोहरीचं तेल हलकं गरम करा आणि केसांच्या मुळात हलक्या हाताने मालिश करा. हे तेल केसांना अर्धा तास लावून ठेवा त्यानंतर केस धुवावे. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय कराल तर प्रभाव दिसू लागेल.
चहा पावडर - चहा पावडर पाण्यात टाकून उकडून घ्या. हे पाणी थंड करून केसांना लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. काही दिवस जर असंच चहा पावडर केसांना लावलं तर पांढरे केस काळे होणं सुरू होतील.
कॉफी - चहा पावडरप्रमाणे कॉफीचाही पांढऱ्या केसांवर प्रभाव दिसतो. कॉफी केसांवर लावल्यानंतर अर्धा तास ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. याने केसांचा रंग आणखी डार्क होईल.
बदामाचं तेल आणि लिंबू पाणी - व्हिटॅमिन ई असलेल्या बदामाच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून 40 ते 50 मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. याने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळेल आणि पांढरे झालेले केस काळेही होतील.
कढीपत्ते आणि खोबऱ्याचं तेल - एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्या आणि यात काही कढीपत्त्याची पाने टाकून तेल गरम करा. या तेलाने केसांची मालिश करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. याने केसांना बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन मिळतं. तसेच याने केसगळतीही कमी होते.