Hair Care Tips : अनेक लोकांच्या केसांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी कोंडा होतो. केसांमध्ये कोंडा झाला की, केसगळती किंवा डोकं खाजवणे, डोक्याच्या त्वचेला इन्फेक्शन होणे अशा समस्या होत असतात. कोंडा झाला की, केसगळतीची समस्या सगळ्यात जास्त होते. केसांची योग्य काळजी न घेणे, प्रदूषण, जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे, वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करणे आणि जास्त तणाव या कारणांमुळे केसगळतीची समस्या होते. अशात ही कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी घरातील एक वस्तू तुमच्या खूप कामी येऊ शकते. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी केसातील कोंडा दूर करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे.
डॉ. नीरा नाथन यांनी सांगितलं की, केसांमधील कोंडा किंवा ऑयली केसांची समस्या दूर करण्यासाठी आठवड्यातून १ ते २ वेळा केसांना अॅपल व्हिनेगर लावायला हवं. याचा वापर करण्यासाठी थोडं अॅपल व्हिनेगर आणि केस धुता भिजवता येतील इतकं पाणी घ्यावं. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून केसांवर स्प्रे करा. काही मिनिटे हे पाणी तसंच राहू द्या आणि नंतर केस धुवून घ्या. काही दिवसात तुम्हाला कोंडा कमी झालेला दिसेल.
आणखी काही घरगुती उपाय
दही आणि लिंबाचा रस
तुम्ही केसांना केवळ दही लावू शकता किंवा त्यात थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. लिंबू आणि दही एकत्र करून लावले तर केसांना आवश्यक पोषण मिळतं. २ चमचे दह्यात १ चमचा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण केसांवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोनवेळा हा उपाय तुम्ही करा.
अंड आणि लिंबाचा रस
दह्यासोबतच केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी इतरही काही उपाय आहेत. एक अंड वाटीमध्ये फेटून घ्या. यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि हा हेअर मास्क केसांवर काही वेळासाठी लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
बेकिंग सोड्यात लिंबाचा रस टाकून केसांना लावल्याने डोक्यातील फंगस किंवा डोक्याच्या त्वचेवरील घाण, कोंडा दूर होतो. २ चमचे बेकिंग सोड्यात आणि ३ चमचे लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावून मालिश करा. याने कोंडाही दूर होतो आणि डोकं खाजवणंही बंद होतं.