(डॉ. श्रेयस अय्यर, द आय फाऊंडेशन)
Eye Care Tips : सध्या भारतात ३० वर्षावरील अनेक लोकांना चष्मा आहे आणि त्यातील ५४ टक्के लोकांना चष्मा लावला म्हणजो म्हातारे झालो असं वाटतं. ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ५० लोक प्रिसबायोपिया या विकारामुळे चष्म्याशिवाय राहू शकत नाहीत. अनेकांना अस्टिग्मॅटिझम हा डोळ्यांचा विकार दूर करण्यासाठी सिलिंड्रिकल चष्मे लागतात. डोळ्याचा आकार अनियमित झाल्यामुळे अस्टिग्मॅटिझम हा विकार उद्भवतो. यामुळे एकतर दूरचं किंवा जवळचं नीट दिसत नाही. प्रिसबायोपिया आणि अस्टिग्मॅटिझम हे दोन्ही विकार वाढत्या वयाबरोबर बळावत जातात. त्यामुळे दूरचं किंवा जवळचं कमी दिसतं. जसं वय वाढतं तसं मोतीबिंदूचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे चष्मा लावूनही नजर अंधूक होते.
मोतीबिंदू ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनाच होतो अशी आधी धारणा होती. मात्र आता अगदी चाळिशी आणि पन्नाशीच्या लोकांनाही तो उद्भवतो आणि दिसण्याचा त्रास होतो. चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स, आयड्रॉप यापैकी कशानेही तो बरा होत नाही. शस्त्रक्रिया करून तो काढून टाकणे हा एकमेव मार्ग आहे.
या शस्त्रक्रियेत शरीरातल्या नॅचरल लेन्सवर इंट्राक्युलर लेन्स घातली जाते. ९६ टक्के रुग्ण मोतीबिंदूचं निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करतात आणि त्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी कोणती लेन्स निवडावी याचा त्यांच्यावर दबाव असतो. सध्या भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या इंट्राक्युलर लेन्स उपलब्ध आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे मोनोफोकल इन्ट्रॉक्युलर लेन्स असते. त्यामुळे दूरचं नीट दिसायला लागतं. आणि बहुतांश वेळी रुग्णांना शस्त्रक्रिया झाल्यावरही चष्मा लावावा लागतो. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे ट्रायफोकल आणि मल्टिफोकल लेन्स मुळे सर्व अंतरांवरचं नीट दिसतं. अस्टिगमॅटिझम असलेल्या रुग्णांनी या इन्ट्रॉक्युलर लेन्स लावल्या तर त्यांनाही या विकारापासून मुक्तता मिळते.
सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत सतत लॅपटॉपवर काम करावं लागतं. त्यामुळे एका विशिष्ट अंतरावर दृष्टी चांगली हवी. एक्सटेन्डेड डेप्थ ऑफ फोकस (EDOF) IOL या विशेष ऑक्युलर लेन्स वापरून हे साध्य होऊ शकतं. पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ९० टक्के लोकांनी चष्म्यावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी लेन्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
चाळिशी किंवा पन्नाशीत मोतीबिंदूचं निदान झालं आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर इन्ट्रॉक्युलर लेन्सेसचा पर्याय ते स्वीकारू शकतात. त्यामुळे ड्रायव्हिंग, वाचन, टीव्ही पाहणं, पोहणं अशा अनेक गोष्टी अगदी सहज करू शकतात. योग्य इन्ट्रॉक्युलर लेन्स वापरली तर आयुष्यभर चष्मा वापरलेले लोक चष्म्यापासून सुटका मिळवू शकतात. त्यासाठी डोळ्यांच्या सर्जनशी त्यांच्या कामाचं स्वरुप, छंद यांची चर्चा करावी. डॉक्टरांना जीवनशैलीबद्दल सांगितलं तर रुग्णांच्या गरजेप्रमाणे इन्ट्रॉक्युलर लेन्स देऊ शकतात. त्याआधी सध्याचा डोळ्याचा नंबर, बुब्बुळाचा आकार, आणि इतर काही व्याधी उदा. डायबेटिस तर नाही ना या गोष्टी तपासून घेऊ शकतात. त्यासाठी रुग्णांना त्यांच्या डोळ्यांच्या सर्जनवर विश्वास ठेवायला हवा. पण अर्थात तो अंधविश्वास नसावा. रुग्णांकडे असलेल्या पर्यायाबद्दल त्यांना योग्य माहिती हवी. प्रत्येक लेन्सचे फायदेतोटेही माहिती असायला हवे. डोळ्याच्या सर्जनशी योग्य चर्चा केल्यास तो रुग्ण योग्य इन्ट्रॉक्युलर लेन्सची निवड करू शकतात.
कमी वयात मोतीबिंदू निघाला तर अनेक जण अस्वस्थ होतात. अनेकांना दैनंदिन जीवनात तो अडथळा वाटतो. पण असं नाहीये. अत्याधुनिक इन्ट्रॉक्युलर लेन्सेसमुळे दृष्टी सुधारते आणि आधी अस्तित्वात असलेल्या समस्या उदा. अस्टिग्मॅटिझम सारखे विकारही दूर होतात.