बऱ्याच लोकांना रात्री झोपेत घोरण्याची समस्या असते. पण जे लोक घोरतात त्यांच्यापेक्षा त्यांच्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीची झोप जास्त खराब होते. कारण जे घोरतात त्यांना त्यांचं घोरणं लक्षात येत नाही. घोरण्याची समस्या दूर करण्याचे वेगवेगळे उपाय नेहमीच सांगितले जातात. पण काहींना याचा फायदा होतो तर काहींना काहीच फरक पडत नाही. अशात योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी घोरणं कमी करण्यासाठी काही उपाय आणि एक व्यायाम सांगितला आहे. जे नियमितपणे केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे व्यायाम करत असतात. पण यात सगळ्यात महत्वाची बाब ठरते नियमितता. जर हे व्यायाम किंवा योगासने नियमितपणे केले गेले नाही तर यांचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही. प्रणाली कदम यांनी सांगितलेले हे उपाय खूप सोपे आणि सहज करता येणारे आहेत.
प्रणाली कदम यांनी व्हिडीओ पोस्ट करून घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत आणि एक योगासन करून दाखवलं आहे.
1) झोपण्याआधी वाफ घ्यावी. याने नाक, छाती मोकळी होईल आणि रात्री घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
2) दुसरा उपाय म्हणजे झोपताना दोन्ही नाकपुड्यांमध्ये एक एक थेंब गायीचं तूप टाकणे. पण हे करत असताना या गोष्टीची काळजी घ्या की, ज्यांना कफ आणि सर्दी आहे त्यांनी हा उपाय करू नये.
3) तसेच झोपण्याआधी थोडं कोमट पाणी प्यावे. यानेही तुमचं घोरणं कमी करण्यास मदत मिळेल.
4) घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सिंहासन करू शकता. सिंहासन तुम्ही रोज केलं तर तुम्हाचा चांगलाच फायदा जाणवेल.
वर सांगितल्या प्रमाणे कोणतेही उपाय हे नियमित आणि योग्य पद्धतीने करणं फार महत्वाचं असतं. सवयी लगेच बदलत नसतात. त्या बदलण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे तुमच्यात खूप पेशन्स असणंही गरजेचं असतं.