Monsoon Tips : सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाला चांगली सुरूवात आहे. जास्तीत जास्त लोक पावसात भिजण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेत आहेत. यात वेगळी मजा असली तरी पावसात केस आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशात अनेकांना हे माहीत नसतं की, पावसात भिजल्यावर काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून केस गळणार नाहीत आणि त्वचेला काही होणार नाही.
केसांची कशी घ्याल काळजी?
- पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर कमी करा. शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा. हेअर स्प्रेचा वापर करणे शक्यतो टाळा.
- प्रत्येकवेळी केस धुतल्यानंतर कंडीशनरचा वापर करा. मात्र, कंडीशनर केसांच्या मुळात लावण्यापेक्षा वरवर लावा.
- प्रोटीनयुक्त आहार सेवन करा. जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचं सेवन करा, तसेच भरपूर पाणी घ्या.
- या दिवसांमध्ये छोटे केस ठेवा आणि खोबऱ्याच्या तेलाने हळुवार मालिश करा. यामुळे केसांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात.
- पावसाळ्यात हेअर ड्रायरचा वापर टाळा आणि जर तो वापरण्याची गरजच असेल तर आधी केस कोरडे करा. हेअर ड्रायरला कमीत कमी सहा इंच दूर ठेवूनच वापरा.
- पावसात केस ओले होण्यापासून वाचवा, खासकरून सुरूवातीच्या दिवसात ही काळजी अधिक घ्या. कारण पावसाच्या पाण्यात हवेतील कण असतात, जे तुमच्या केसांना कमजोर आणि निर्जिव करू शकतात.
स्किन इन्फेक्शन
पावसाच्या पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन इन्फेक्शन होतात. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात गेल्यास पायांच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. पावसाच्या पाण्यामुळे काही लोकांची त्वचा अधिक जास्त कोरडी होते. त्वचेवर पिंपल्स यायला लागतात. अशावेळी काय काळजी घ्यावी हे खालीलप्रमाणे बघता येईल.
कोरडी त्वचा
पावसाच्या पाण्याचा सर्वात जास्त फटका हा कोरड्या त्वचेवर पडतो. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी प्यायला हवं. यामुळे शरीरातील टॉक्सिन सहज बाहेर पडतात. जर पावसामुळे त्वचा अधिकच कोरडी वाटत असेल तर जोजोबा ऑइल, ताजं दही आणि मध मिश्रीत करुन एक फेसपॅक तयार करा. हा चेपऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तसेच तुम्ही बदाम आणि मधाचा फेसपॅकही लावू शकता. त्यासोबतच कोरडी त्वचा असणाऱ्यांनी पावसाळ्यात अल्कोहोलचे सेवनही करु नये.
तेलकट त्वचा
तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी पावसाळ्यातील थंडावा दिलासा देणारा असला तरी याचे काही दुष्परिणामही आहेत. यामुळे स्किन इन्फेक्शन होतं. या दिवसात येणाऱ्या हवेत मोठ्या प्रमाणात दुषित कण असतात, जे त्वचेवर चिकटतात. त्याने स्किन इन्फेक्शन होतं. अशावेळी तुम्ही दिवसातून ३-४ वेळा चेहरा धुवायला पाहिजे. तसेच दूध, दही, लिंबू, गुलाब जल यानेही चेहरा स्वच्छ करा.