Teeth Whitening tips : दातांवरील पिवळेपणा ही एक कॉमन समस्या झाली आहे. बऱ्याच लोकांचे दात वेगवेगळ्या कारणांनी पिवळे पडतात. कुणाचे तंबाखू, गुटखा खाल्ल्याने तर कुणाची एखाद्या आजारामुळे किंवा कुणाचे काही केमिकल्समुळे दात पिवळे पडतात. त्यामुळे चारचौघात पिवळ्या दातांमुळे मोकळेपणाने हसताही येत नाही.
दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे टूथपेस्ट किंवा केमिकल्सचा वापर करतात. दिवसात दोन ते तीन वेळा ब्रशही करतात. पण तरीही दातांचा पिवळेपणा काही जात नाही. सगळ्यांनाच चमकदार आणि पांढरे दात हवे असतात. मात्र, दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी आणि दात चमकदार करण्यासाठी तुम्हाला योग्य उपाय करावा लागेल. असाच एक नॅचरल उपाय आज आम्ही सांगणार आहोत.
हळदीला आयुर्वेदात फार महत्व आहे. हळदीचा अनेक आजारांच्या उपचारात वापर केला जातो आणि त्याचा लोकांना फायदाही होतो. हळद शरीरातील अनेक समस्या दूर करते. सोबतच खोबऱ्याचं तेलही फार हेल्दी आणि फायदेसीर असतं. भारतातील बऱ्याच भागांमध्ये खोबऱ्याच्या तेलात जेवण बनवलं जातं. या दोन गोष्टींचा वापर करून तुम्ही दातांचा पिवळेपणा घालवू शकता. तो कसा हे बघुया. इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून हा उपाय कसा करायचा हे सांगण्यात आलं आहे.
कसा कराल उपाय?
एका वाटीमध्ये एक चमचा हळद घ्या आणि त्यात एक चमचा खोबऱ्याचं तेल टाका. याचं चांगलं मिश्रण तयार करा. हे मिश्रण दातांवर ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासा. नंतर पाच मिनिटे ते दातांवर तसंच राहू द्या. त्यानंतर पाण्याने दात चांगले स्वच्छ करा. काही दिवस हा उपाय केला तर तुम्हाला चमकदार आणि पांढरे दात मिळतील. सोबतच हळदीमुळे आणि खोबऱ्याच्या तेलामुळे तुमच्या हिरड्याही मजबूत होतील.