नवी दिल्ली : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) प्लाझ्मा थेरपीबाबत मोठे विधान केले आहे. नॅशनल हेल्थ क्लिनिकल प्रोटोकॉलमधून प्लाझ्मा थेरपी हटविण्याचा विचार करीत आहेत. तसेच, अनेक स्टडीमध्ये याआधी म्हटले आहे की, मृत्यू दर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी फार प्रभावी नाही, असे आयसीएमआरने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, आयसीएमआरने यापूर्वी बर्याच वेळा प्लाझ्मा थेरपीबाबत सवाल उपस्थित केले आहेत. अलीकडेच, आयसीएमआरने सांगितले होते की कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपीऐवजी आता अँटीसेरा पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. तसेच, कोरोनावर उपचार करण्यासाठी प्राण्यांच्या रक्ताच्या सीरमचा वापर करून हायली प्योरिफाइड अँटीसेरा विकसित केल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. याचबरोबर, अँटिसेरा प्राण्यांपासून मिळालेले ब्लड सीरम आहे, ज्यामध्ये विशिष्ट अँटिजनच्या विरोधात अँटिबॉडिज असतात. ते विशिष्ट रोगांच्या उपचारांसाठी वापरले जातात, असे आयसीएमआरचे डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले.
कोरोना संकट काळात प्लाझ्मा थेरपी चर्चेत आली. कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांच्या शरीरातून घेतलेला प्लाझ्मा कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या शरीरामध्ये वापरला जात आहे. ज्यामुळे रुग्णांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडी तयार होतात. कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जगातील इतर अनेक देशांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, दक्षिण कोरिया, इटली, तुर्की आणि चीनसह अनेक देशांमध्ये याचा वापर केला जात आहे.