नवी दिल्ली - पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन हे आता स्वप्न राहिलेले नाही तर प्रत्यक्षात आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या दिशेने घेतलेली पहिली गर्भनिरोधक चाचणी यशस्वी झाली आहे. एकूण ३०३ निरोगी पुरुष स्वयंसेवकांवर हा प्रयोग ७ वर्षे चालला. गैर-हार्मोनल इंजेक्टेबल पुरुष गर्भनिरोधक RISUG (रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स) पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. हे दिर्घकाळ काम करू शकते असं अभ्यासात दिसून आले आहे.
अभ्यासाच्या तिसर्या टप्प्याचे निष्कर्ष इंटरनॅशनल ओपन ऍक्सेस जर्नल एंड्रोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यानुसार, ३०३ निरोगी, लैंगिकदृष्ट्या सक्रिय आणि विवाहित पुरुषांना (वय २५-४० वर्षे) कुटुंब नियोजनासाठी निवडले गेले. त्यांना ६० मिलीग्राम RISUG चे इंजेक्शन देण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही गंभीर दुष्परिणामांशिवाय RISUG सह ९९ टक्के गर्भधारणा टाळता येऊ शकते.
अभ्यासानुसार, RISUG ने ९७.३% एझोस्पर्मिया गाठले. ही एक वैद्यकीय व्याख्या आहे की वीर्यमध्ये कोणतेही व्यवहार्य शुक्राणू नसतात असं सांगते. स्वयंसेवकांच्या पत्नींच्या आरोग्यावरही लक्ष ठेवण्यात आले असून, कोणतेही विपरीत परिणाम होत नसल्याचे आढळून आले. आजपर्यंत महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या सहजपणे उपलब्ध होत होत्या परंतु पुरुषांसाठी कुठलाही पर्याय नव्हता. आता ७ वर्षाच्या अथक प्रयत्नांनी ICMR ला दिशेने मोठे यश हाती लागले आहे.
या चाचणीसाठी जयपूर, नवी दिल्ली, खडगपूर, उधमपूर आणि लुधियाना येथील हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चवेळी काही पुरुषांना थोडी समस्या जाणवली, जी लगेच दूरदेखील झाली. पुरुषांना लघवीवेळी जळजळ, ताप अशी समस्या होती. त्याशिवाय कुठलेही दुष्परिणाम पुरुषांवर झाले नाहीत.