जळगाव : जिल्ह्यातील कुष्ठरोग संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १३ ते ३० सप्टेंबर दरम्यान, कुष्ठरोग आणि क्षयरोग रुग्णशोध मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेचा उद्देश प्राथमिक स्थितीतील कुष्ठरोगाचे नवीन रुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करणे, त्यांच्यात कोणतीही विकृती येऊ न येता ते बरे होतील यासाठी प्रयत्न करणे हा आहे. सर्व रुग्ण उपचाराखाली आल्यास रोगप्रसाराची साखळी खंडित होते. जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये सद्यस्थितीत ५९१ रुग्ण उपचाराधीन आहेत. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कुष्ठरोग होऊ शकतो.
शोध मोहिमेत जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३० लाख ५० हजार २३३ आणि शहरी भागात ४ लाख ९९ हजार ४४५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरुष मदतनीस आणि आशा वर्कर यांची मदत घेतली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी ३०५९ पथकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पर्यवेक्षक म्हणून ६२४ जण काम पाहणार आहेत. डॉ. इरफान तडवी (सहायक संचालक, कुष्ठरोग) यांनी शोध मोहीम कालावधीत प्रत्येक गावात आरोग्य विभागाची पथके जाणार आहेत. त्यांना कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत माहिती द्यावी, तपासणी करू द्यावी, असे आवाहन केले आहे. या मोहिमेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
असे होते निदान
रुग्णांचे निदान करण्यासाठी संशयिताची बेडका तपासणी, एक्स-रे, सीबी नॅट आदी चाचण्या केल्या जातात. या आजारावर अजून लस सापडलेली नाही पण रामबाण औषधे उपलब्ध आहेत. रुग्णांना सहा ते बारा महिनेपर्यंत उपचार घ्यावा लागतो. त्यानंतर रुग्ण शंभर टक्के बरा होतो. कुष्ठरोगींना आरोग्य केंद्रात मोफत औषधोपचार मिळतात.
याद्वारे होतो प्रसार
कुष्ठरोगींच्या शिंकेद्वारे व श्वसनाद्वारे कुष्ठरोगाचे जंतू (मायक्रोबॅक्टरियम लेप्री) वातावरणात सोडले जातात. निरोगी व्यक्तीच्या शरीरात श्वसनाद्वारे हे रोगजंतू प्रवेश करतात. रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास रोगाची लक्षणे दिसून येतात, सर्वच लोकांना हा आजार होत नाही पण ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना हा आजार होतो.
जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णतालुका - रुग्णसंख्याचाळीसगाव - १००जळगाव - ७७पाचोरा - ५८पारोळा - ५३चोपडा - ५४धरणगाव - ४४भडगाव - ३४जामनेर - ३४रावेर - ३१अमळनेर - २६यावल - २५भुसावळ - २४बोदवड - ०९एरंडोल - १२मुक्ताईनगर - १०