(Image Credit: www.medimanage.com)
घरातील वयोवृद्ध लोक हे नेहमी सांगतात की, जेवण नेहमी सर्वांनी एकत्र केलं पाहिजे. एकट्याने जेवण करणं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे कुणीही जेवायला बसलं असेल आणि अशात कुणी आलं तर त्यालाही जेवायला बोलवण्याची एक अलिखीत प्रथा आहे. जुने लोक सांगतात की, एकत्र बसून जेवणं चांगलं असतं. तर मॉडर्न रिसर्चनुसार एकत्र बसून जेवल्यास जास्त जेवण केलं जातं. इतकेच नाहीतर एकत्र जेवायला बसल्यास आपण असेही पदार्थ खातो जे कधी खाल्ले नाहीत.
तशी घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची प्रथा वर्षांनुवर्षे सुरु आहे. जेव्हा मनुष्य शिकार करुन पोट भरत होते तेव्हाही ते एकत्र जेवण करत होते. एका रिसर्चमध्ये तर हेही सांगण्यात आले आहे की, एकटे जेवल्याने माणसाला डिप्रेशन आणि तणावाचा सामना करावा लागतो.
मासनिक आरोग्याचे तज्ञ जॉन दी कास्त्रो यांनी 1994 मध्ये 500 लोकांवर एक रिसर्च केला होता. यात एकत्र जेवणारे आणि एकटे जेवणारे काही लोक होते. यांचा अभ्यास करुन असा निष्कर्ष काढण्यात आला की, ग्रुपमध्ये जेवण करणारे लोक जास्त जेवण करतात.
आणखी एका रिसर्चच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की, ग्रुपमध्ये जेवण करणारे लोक हे 40 टक्के जास्त आइस्क्रीम किंवा इतर पदार्थ खातात. तेच जेव्हा लोक एकटे जेवण करतात तेव्हा अशा गोष्टींना ते हातही लावत नाहीत.
काय आहे कारण?
कास्त्रो यांच्यानुसार जेव्हा लोक एकत्र जेवण करतात तेव्हा त्यांच्यात जेवता जेवता गप्पाही होतात. आणि अनेकदा बोलता बोलता हातही थांबतो. यामुळे जेवणाचा वेळ वाढतो. मोठ्या समूहात जेवण करणारे लोक अधिक जास्त बोलतात आणि त्यामुळे त्यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. आपल्याला केवळ पोट भरायचं आहे हे त्यांच्या लक्षता येत नाही. तेच जर लोक कमी लोकांमध्ये जेवण करत असतील किंवा एकटे जेवण करत असतील तर जास्त लवकर जेवण संपवतात. त्यामुळे ते जास्त खात नाहीत.
काही रिसर्चचा वेगळा अभ्यास
दुसरीकडे काही रिसर्च असं सांगतात की, लोक एकत्र जेवायला बसले की जास्त खात नाहीत. एका रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा आपण एकटे जेवण करतो किंवा अशा एखाद्या व्यक्तीसोबत करतो ज्याच्या सवयी आपल्याला माहीत आहेत. त्यावेळी आपण बिनधास्त होऊन खातो. पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये जेवतो तेव्हा त्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सगळेच संकोच करतात. कुठे ना कुठे डोक्यात हे सुरु असतं की, आपल्या जेवण्याच्या सवयीमुळे समोरचा व्यक्ती काय विचार करेल.