कोरोना काळ, वर्क फ्रॉम होममुळे शारिरीक हालचाली कमी झाल्या आहेत. जीवनशैलीशी निगडीत अनेक आजार जसे की डायबिटीस, ब्लडप्रेशर आदी वाढले आहेत. सतत कम्प्युटरवर बसून काम केल्याने वजन तर वाढतेच परिणामी अनेक आजार मागे लागतात. जर तुम्ही दिवसभरातील बसण्याची वेळ एका तासाने कमी केली तर यामुळे जीवनशैलीशी निगडित अनेक आजारांचा धोका कमी होतो. असे संशोधनच नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
काय आहे संशोधन?फिनलँड स्थित तुर्कु युनिवर्सिटी आणि युकेके इन्स्टिट्युट यांनी केलेल्या संशोधनात असे निष्कर्ष काढण्यात आले की तुमच्या बसण्याची वेळ तुम्ही एका तासाने कमी केली तर त्याचा तुम्हाला खुप फायदा होतो. यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे आजार तुम्हाला शिवणारही नाहीत.
कसं झालं संशोधन?या साठी दोन गट करण्यात आले. एका गटातील व्यक्तींना जीवनशैलीत बदल करण्यास सांगून विविध व्यायाम सुचवले. त्यांना त्यांचा दिवसभरातील बसण्याचा कालावधी एका तासाने कमी करण्यास सांगण्यात आला. तर दुसऱ्या गटाला त्याच्या जीवनशैलीत काहीही बदल करण्यास न सांगता बसण्याचा कालावधी नेहमीप्रमाणे ठेवण्यास सांगण्यात आला. यात डायबिटीस, ब्लड प्रेशरचे रुग्ण तसेच कमी शाररिक हालचाल असणाऱ्या वयस्कर व्यक्तींचाही समावेश होता.
काय आले निष्कर्ष?ज्या लोकांनी त्यांचा बसण्याचा कालावधी एका तासाने कमी केला होता त्यांच्या जीवनशैलीत आणि आरोग्यात सकारात्मक बदल झाले होते. त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीस सारख्या आजारांचा धोका कित्येक पटीने कमी झाला होता. त्यासोबतच जीवनशैलीचे इतर आजारही कमी झाले होते.