(Image Credit : lifealth.com)
प्रत्येक व्यक्तीची दिवसाची सुरुवात ही गरमागरम चहाने होते. चहा घेतला की, अनेकांना फ्रेश झाल्यासारखं वाटतं. जास्तीत जास्त लोकांचा हा आग्रह असतो की, चहा हा गरमच असावा. पण फार जास्त गरम असलेला चहा पिणे फारच घातक ठरु शकतं. तज्ज्ञ तर सांगतात की, चहा कपात टाकल्यानंतर कमीत कमी पाच मिनिटांची सेवन करावा. तुम्हालाही चहा कपात ओतल्या ओतल्या सेवन करण्याची सवय असेल तर हे तुमच्या घशासाठी आणि अन्ननलिकेसाठी नुकसानकारक ठरु शकतं.
चुकीची आहे ही सवय
चहा हा सामान्यपणे गरम प्यायला जातो आणि यात अजिबातच दुमत नाहीये की, गरमागरम चहा पिण्यात एक वेगळीच मजा असते. तुम्हीही असाच विचार करत असाल तर टेस्ट म्हणून हे ठिक आहे. पण आरोग्यासाठी हे चांगलं नाहीये. चहा कपात टाकल्यानंतर साधारण ५ मिनिटांनीच सेवन करावा असं मानलं जातं.
वाढतो धोका
ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्येही हे समोर आलं आहे की, जास्त गरम चहा प्यायल्याने अन्ननलिका किंवा घशाचा कॅन्सर होण्याचा धोका ८ पटीने वाढतो. इराणमध्ये चहा फार जास्त प्रमाणात सेवन केला जातो, तेथील लोक तंबाखू आणि सिगारेटचंही फार जास्त सेवन करत नाहीत. पण तेथील लोकांमध्ये इसोफेगल कॅन्सर आढळला आहे. या मागचं कारण फार जास्त गरम चहा पिणे हे आहे. याने घशाच्या टिश्यूजचं नुकसान होतं.
रिसर्चने झालं हे निश्चित
या रिसर्चसाठी जवळपास पन्नास हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांच्यावर झालेल्या अभ्यासानंतर ही बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनुसार, चहा पिणे आणि कपात टाकणे यात कमीत कमी पाच मिनिटांचं अंतर असावं.
इतरही आजारांचा धोका
कॅन्सरच्या धोक्यासह गरम चहा प्यायल्याने अॅसिडीटी, अल्सर आणि पोटाशी संबंधी इतरही समस्या होऊ शकतात. केवळ गरम चहाच नाही तर इतरही गरम पदार्थ किंवा पेय प्यायल्याने अन्ननलिकेला समस्या होऊ शकते. याने पोटाशी निगडीत अनेक समस्या होण्याचा धोका होतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की, फार जास्त गरम चहा सेवन करू नये किंवा फार जास्त गरम पदार्थ खाऊ नये.
जास्त चहामुळे हाडांचा आजार
तज्ज्ञांनुसार, अनेक वर्षांपासून तुम्ही जर रोज सकाळी एकापेक्षा जास्त कप चहा घेणे तुमच्या हाडांसाठी हानिकारक ठरु शकतं. अनेकांना चहाची सवय असते, काही लोक हे दिवसातून ४ ते ५ कप चहा घेतात तर काही लोक हे दिवसातून १० ते १२ कप चहा घेतात. चहाने तुम्हाला फ्रेश वाटतं हे जरी खरं असलं तरी जास्त प्रमाणात चहा घेण्याचे अनेक तोटेही आहे.
चहामुळे हाडांना होणारं नुकसान फार उशिरा समोर येऊ शकतं आणि याची काळजी न घेतल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. खासकरुन चहामध्ये असलेल्या फ्लोराइड नावाच्या खनिजामुळे हाडांना धोका होऊ शकतो. फ्लोराइडचं खूप जास्त प्रमाण हाडांमध्ये स्केलेटल फ्लोरोसिस होण्याचा धोका वाढवू शकतं. आर्थरायटिससारखा दिसणारा हा आजार हाडांमध्ये वेदना निर्माण करतो. यात कंबर, हात-पाय किंवा जॉईंट्समध्ये वेदना होऊ शकतात. एक खनिज असल्या कारणाने फ्लोराइडचं सामान्य प्रमाण दातांसाठी फायदेशीर असतं आणि पण याचं प्रमाण जास्त झालं तर नुकसान होतं.