'लवकर निजे, लवकर उठे' असे आपण नेहमीच घरातील मोठ्या माणसांकडून ऐकतो. असं केल्यानं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तसेच रोगांपासून बचाव करण्यासाठी मदत होते. परंतु, आतापर्यंत ऐकिवात असलेल्या या गोष्टी आता एका संशोधनातून देखील सिद्ध झाल्या आहेत.
स्पेनमधील बार्सिलोना इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ (आईएसग्लोबल)मध्ये झालेल्या संशोधनात असे सांगितले आहे की, रात्री 9 वाजण्यापूर्वी जेवण केल्यास किंवा झोपण्याच्या दोन तास आधी जेवणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका नसतो. इंटरनेशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात सांगण्यात आले आहे की, रात्री लवकर जेवणऱ्यांना ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता उशीरा जेवणाऱ्यांच्या तुलनेत कमी असते.
या संशोधनादरम्यान संशोधकांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळा आणि कॅन्सरचा धोका याचा काय संबंध असू शकतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरात ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सर असणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. संशोधकांचे असे मत आहे की, लोकांच्या झोपण्याची आणि जागे राहण्याच्या प्रक्रियेत यामुळे बाधा येते. तसेच शरीरातील अन्य प्रक्रियांवरही परिणाम होतो.
या संशोधनासाठी संशोधकांनी प्रोस्टेट कॅन्सरच्या 621 आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या 1205 रूग्णांचा अभ्यास केला आहे. त्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटरमधून 872 पुरुष आणि 1321 महिलांना निवडण्यात आले होते.