- सारिका पूरकर-गुजराथी
सध्या सर्वच वर्तमानपत्रांमध्ये, मुख्य रस्त्यांवरील सिग्नल्सवर मान्सून सेलच्या जाहिराती झळकत आहेत. ५० टक्के डिस्काऊंट, ३० टक्के डिस्काऊंट अशा आकर्षक सवलती ब्रॅण्डेड कपड्यांपासून फर्निचर, किचन वेअर, होम अप्लायन्सेसवर दिल्या जाताहेत. साहजिकच त्यामुळे या खरेदीच्या गंगेत हात धुवून घ्यायला ग्राहकांची तोबा गर्दी होत आहे. त्यातल्या त्यात महिलांच्या उत्साहाबद्दल तर विचारुच नका. मान्सून सेल ही खरेदीची एक सुवर्णसंधी असते मात्र ती साधता यायला हवी . एक ग्राहक म्हणून आपल्याला या संधीचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टींची जागरूकता खरेदी करताना दाखवायलाच हवी. नाहीतर स्वस्तातली खरेदी करण्याच्या मोहात आपण आपलंच नुकसान करून घेतो.
मान्सून सेलमध्ये खरेदी कशी करावी?
१) कोणत्याही मान्सून सेलमध्ये खरेदी करण्यासाठी तो सेल लागला, जाहीर झाला की लगेच पहिल्याच आठवड्यातच खरेदी करण्यावर भर द्यावा. जेणेकरुन सेलमधील उत्तम दर्जाच्या वस्तू, कपडे तुम्हाला घेता येतील. जशी गर्दी वाढेल तशी सेलमधील वस्तू, कपडे यांची व्हरायटी कमी होत जाण्याची शक्यता असते.
२) सेलमध्ये खरेदी दिवसाच करा, सायंकाळी नोकरदारांची गर्दी जास्त होते. त्यामुळे वस्तू पारखून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
३) सेलमध्ये खरेदी करताना नेहमी जास्त संख्येनं आणि काही वेळेस शक्य झाल्यास फ्रेंड्स ग्रूप मिळून वस्तूंची, कपड्यांची खरेदी करा जेणेकरुन ही खरेदी तुमच्या फायद्याची ठरेल. उदाहरणच द्यायचं झालं तर २००० रुपयांमध्ये तीन शर्ट्स, साड्या असतील तर तुम्ही तीन मित्र, मैत्रिणी मिळून ते खरेदी करु शकता.
४) सेलमध्ये देण्यात येणारे डिस्काऊंट्स, वस्तूंच्या किंमती या नेहमीच ‘ बेस्ट ’ नसतात. सर्वच वस्तू, उत्पादनांवर एकच डिस्काऊंटही नसतो. त्यामुळे या किंमतींचा अभ्यास करुन, इतर दुकानांमधील डिस्काऊंटशी त्यांची तुलना करुनच खरेदीचा निर्णय घ्यावा.
५) एकावर एक फ्री, किंवा दोन खरेदी करा एक मोफत मिळवा, अशा आॅफर्स नेहमी काळजीपूर्वक हाताळा. तुम्हाला या संख्येत ती वस्तू, कपडे लागणार आहेत का? याचा विचार करा आणि मगच खरेदी करा.
६) मान्सूनसेलमध्ये कपड्यांची खरेदी सर्वात जास्त काळजीपूर्वक करणं आवश्यक असतं. कारण जीन्स, टॉप, कुर्तीज यांची फिटिंंग, त्यांची योग्य साईज तुम्हाला मिळतेय का? हे आधी तपासा. अन्यथा केवळ स्वस्त मिळतेय म्हणून केलेली ही खरेदी पैशांचा चुराडा ठरु शकते.
७) मान्सून सेलमधील खरेदीचे योग्य नियोजन करा, आपल्याला नेमक्या काय वस्तू घ्यायच्याय? याची यादी करा. त्याकरिता तुमचे वॉर्डरोब चेक करा. समजा तुमच्याकडे एखादी कुर्ती असेल तर त्यावर तुम्ही लेगिन्स घेऊ शकता किंवा लेगिन्स असेल तर कुर्ती घेऊ शकता. त्याचप्रमाणे घरातील इतर सदस्यांचे वॉर्डरोब तपासून घ्या. कपड्यांप्रमाणेच इतर वस्तू जसे की चपला, मनगटी घड्याळे, पर्स इ.वस्तूंची चाचपणी करा. किचनमध्ये काय आवश्यक आहे, घरसजावटीसाठी काही हवं आहे का? हे देखील पाहून घ्या. नाहीतर सेलमध्ये व्हरायटी खूप असते आणि आपण आपल्या गरजांचा नीट अभ्यास केलेला नसतो त्यामुळे एकाच प्रकरची खरेदी होण्याचीही शक्यता असते.
८) मान्सून सेल हल्ली गल्लीबोळातील दुकानांमध्येही लावले जातात. परंतु नामांकित ब्रॅण्ड्सच्या मान्सून सेलमधूनच ही खरेदी केल्यास उत्तम दर्जाच्या वस्तू योग्य दरात मिळू शकतात. त्यामुळे या भुलभुलैय्याला बळी न पडता जागरूकता बाळगावी.
९) सध्या तर इमिटेशन ज्वेलरी, इनर वेअर्स यांचेही मान्सून सेल लावले जातात. या वस्तू खरेदी करताना दागिन्यांची चमक, त्यात असणारे प्रकार, त्यांची फिनिशिंग हे सर्व तपासून घ्यावं. तसेच कपडे डिफेक्टिव्ह नाहीत ना याचीही खात्री करून घ्यावी.