सकाळी सकाळी कारल्याचं नाव काढलं म्हणून नाराज हो नका आणि योगायोगाने टिफिनमध्ये कारल्याची भाजी मिळाली म्हणून वाईटही वाटून घेऊ नका. कारण कडू कारले तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. त्याचे फायदे वाचलेत तर तुम्हीसुद्धा निदान आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी, रस किंवा कारल्याचे काप आवडीने करून खाल. चला तर जाणून घेऊ त्याचे फायदे!
कारल्याच्या रसाचे फायदे
कारल्याचा रस रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. विशेषतः मधुमेही लोकांसाठी कारले हे वरदान आहे. यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण तर राहतेच पण पचनशक्तीही सुधारते. याशिवाय हे रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयासाठीही खूप चांगले मानले जाते. जर तुम्ही रस पिऊ शकत नसाल, तर तुम्ही चटकदार चवीची भरली वांगी खा, त्यानेही तेवढाच फायदा होईल. येनकेनप्रकारेण कारले पोटात जाणे महत्त्वाचे आहे.
>>कारल्यामध्ये फायबर अधिक असल्याने पचन यंत्रणा सुरळीत ठेवण्यास त्याची खूप मदत होते. म्हणून कारल्याची भाजी पानात वाढली तर नाक मुरडू नका, ते नैसर्गिक औषध आहे असे समजून चवीने खा!
>>कारल्याची बी फार महत्त्वाची असते. कारल्याच्या रसात ती वापरली जाते, म्हणून आवडत नसला तरी पंधरा दिवसांनी एकदा कारल्याचा रस नाक बंद करून का होईना, पण प्या!
>>कारल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो त्यामुळे हृदय विकारांना आळा बसतो.
>>कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कारल्यासारखा सोपा उपाय नाही. महागडी औषधं खाण्यापेक्षा वेळेतच कारल्याची भाजी खायला सुरुवात करा. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने वजन कमी होण्यासही हातभार लागेल.