कॅन्सर हा असा आजार आहे, ज्यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपीसारख्या उपचार पद्धतींचा वापर करून त्यापासून सुटका मिळवता येते. पहिल्या दोन स्टेजनंतर मात्र, कॅन्सवर मात करणं जवळपास अशक्यच आहे. गेल्या काही वर्षांत भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णसंख्येमध्ये वेगानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामागील नेमकं कारण सांगता येणार नाही.
कॅन्सरच्या गोळ्या-औषधांमुळे आणि रेडिएशन थेरेपींमुळे शरीरावर विविध प्रकारचे साईड ईफेक्ट होतात. त्यामुळे कॅन्सर उपचारांदरम्यान रुग्णाला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करून कॅन्सर काही प्रमाणात टाळता येऊ शकतो. तुमचं वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल तर खालील गोष्टींच्या आधारे तुम्ही काहीअंशी कॅन्सर टाळू शकता. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सनस्क्रीन वापरा40 वर्षांपेक्षा कमी वय असल्यास त्वचेच्या कर्करोगावर उपचार होऊ शकतात, असं संशोधनात म्हटलं आहे. प्रामुख्यानं अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सनस्क्रीन क्रीमचा वापर केल्यास अतिनील किरणांपासून तुम्ही तुमच्या त्वचेचं संरक्षण करू शकता. त्यामुळे तुम्ही तिशीचे असा किंवा पन्नाशीचे प्रत्येकाने दररोज सनस्क्रीन क्रीम लावण्याची सवय अंगिकारली पाहिजे. विविध त्वचा प्रकारांना लागू होतील अशी अनेक कंपन्यांची सनस्क्रीन बाजारात उपलब्ध आहेत.
वजन नियंत्रणात ठेवा -सध्या बहुतेक लोक अस्ताव्यस्त जीवनशैली जगत आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि इतर प्लॅटफॉर्म आल्यामुळे बाहेरील अन्न खाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही गंभीर आजारांना बळी पडू शकता. हे टाळण्यासाठी तरुणपणापासूनच सकस आहार घेऊन वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे.
सिगरेट ओढू नका -सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सिगरेटचं व्यसन करते. सिगरेटमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरसह इतर 14 प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला सिगरेट ओढण्याची सवय असेल तर आजपासूनच ती बदला. तरुणवयात या गोष्टींचा फार दुष्परिणाम जाणवत नाही. मात्र, या गोष्टीमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार आपल्याला सहज जडतात.
अल्कोहोलचं सेवन टाळा -अल्कोहोल किंवा अल्कोहोल असलेले खाद्यपदार्थ अनेकांना आवडतात. मात्र, असे पदार्थ तुमच्या शरीराला अनेक रोगांचं घर बनवू शकतात. काही लोक वर्षानुवर्षे दारू पितात. त्यामुळे त्यांना कॅन्सरसह अनेक गंभीर आजार जडतात. एका अहवालानुसार, दारूमुळे जगभरात दरवर्षी एक लाख कॅन्सरची प्रकरणं नोंदवली जातात. हे टाळण्यासाठी तरुणवयापासूनच अल्कोहोलपासून दूर राहिलं पाहिजे.
कॅन्सर हा आजार मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळींवर व्यक्तीला त्रास देतो. त्यामुळे तो होऊच नये यासाठी प्रत्येकाने चांगल्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत.