हिवाळ्यातील वातावरण अल्हाददायी असलं तरिही या दिवसांत आरोग्याची मात्र अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. जर दुर्लक्षं केलं तर ते घातक ठरू शकतं. कारण या वातावरणात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या वातावरणात सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं.
तुम्हालाही या बदलत्या वातावरणात जर आजारांपासून लांब रहायचं असेल तर पुढिल गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
संतुलित आहार
थंडिमध्ये गरम आणि हलक्या पदार्थांचा समावेश करा. तसेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचं सेवन करा. त्यासोबत थंड पेय, पदार्थ खाणे टाळा. यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. तसेच आहारात आवला, तुळस, त्रिफळा यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश करा.
मालिश करा
आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराची तेलाने मालिश करा. यासाठी तिळाचे किंवा सूर्यफूलाचे गरम तेलाचा वापर करा. त्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण नियमित होते.
पुरेशी झोप
आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे नियमित झोप. थंडीच्या ऋतुत पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. याने शरीराला ताकद मिळते आणि आपण दिवसभर टवटवीत राहतो.
त्वचेची काळजी
हिवाळ्यात आरोग्याबरोबरच त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं. जर दुर्लक्षं केलं तर त्वचा रोग किंवा स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका बळावतो.
व्यायाम करा
थंडीमध्ये व्यायाम केल्याने इतर ऋतुच्या तुलनेत अधिक फायदा होतो. या काळात जास्त उर्जा खर्च होत असल्याने तुम्हाला छान भूक लागते. परिणामी तुमचे वजन वाढण्यास मदत होते. थंडीत घाम येत नसल्याने शरीरातील उत्सर्जन काही प्रमाणात कमी झालेले असते, त्याची कमतरता व्यायाम केल्याने भरुन निघते.
नियमित अंघोळ
सकाळी थंडी वाजत असल्याने बऱ्याचवेळा आपण अंघोळ टाळतो. मात्र तसे करणे चुकीचे आहे. शरीराची मस्त मालिश केल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. गरम पाण्याने अंघोळ करताना पाण्यात मीठ, इलायची, तुळस किंवा मग कडुनिंबाची पाने पाण्यात टाका. त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)