नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. गत दीड वर्षात सर्व जगभर हानी करत असलेल्या कोविड संक्रमणाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न करत पहिल्या आणि दुसर्या लाटेत समाजाला या संकटातून यशस्वीरीत्या बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सदस्यांचा तसेच इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
ऑक्सिजन, औषधांचा अभाव यासह विविध अडचणींचा सामना करत शतकातून एकदा येणाऱ्या या मोठ्या संकटाचा धैर्याने सामना केल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आयएमएतर्फे कौतुक करण्यात आले. खाजगी रूग्णालय महानगरपालिका रूग्णालय आणि शासकीय रूग्णालये येथे काम करणाऱ्या विविध डॉक्टरांचा त्यात समावेश होता. नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निखिल सैंदाणे , डॉ. आवेश पलोड, डॉ अनंत पवार, डॉ प्रशांत शेटे, डॉ अजिता साळुंके डॉक्टर कल्पना कुटे, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ नितीन रावते, डॉ अनिता हिरे यांचा कोविड सेवेतील योगदानासाठी आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैद्यकीय सेवा ही टीमवर्क असते. डॉ प्रेरणा शिंदे, डॉ शलाका बागूल, डॉ प्रतिभा बोरसे,डॉ नितीन चिताळकर,डॉ कपिल पाळेकर, डॉ सागर भालेराव,डॉ पंकज भट, डॉ प्रीती लुंकड यांनी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.