नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 67,57,132 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,04,555 लोकांना जीव गमवावा लागला आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी विविध घरगुती उपाय केले जात आहेत. प्रामुख्याने अनेक जण आयुर्वेदिक काढा घेत आहेत. काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं. मात्र सध्या आयुर्वेदिक काढ्याबाबत अनेकांच्या मनात नानाविध शंका निर्माण झाल्या आहेत.
आयुर्वेदिक काढा दीर्घकाळ घेतल्यानंतर यकृताला नुकसान होतं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र आयुष मंत्रालयाने या दाव्याचं खंडन केलं आहे. आयुर्वेदिक काढा घेतल्याने यकृताला नुकसान पोहोचतं ही धारणा चुकीची असल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. कारण काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू घरात जेवण बनवताना वापरल्या जातात असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. दालचीन, तुळस आणि काळीमिरीचा उपयोग काढा बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा श्वसनयंत्रणेवर चांगला परिणाम होतो अशी माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिली आहे.
काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. मंत्रालयाने अन्य पदार्थांसोबत तुळस, दालचीन, काळीमिरी, सुंठ यांचा उपयोग करून काढा बनवण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा दिवसातून दोन वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त आहे असं मंत्रालयाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आयुष विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना सगळ्या प्रकारच्या रुग्णांना एलोपॅथी रुग्णालयात दाखल केलं जात आहे. एलोपॅथी डॉक्टर आयुष औषधं लोकांना देत आहेत. अजूनही सगळ्या रुग्णांपर्यंत ही औषध पोहोचलेली नाहीत. तज्ज्ञांनी सांगितले की, याचा लाभ सगळ्याच रुग्णांना मिळायला हवा. त्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे.
जाणून घ्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्स
कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत योगा किंवा ध्यान करणं आवश्यक आहे.
जेवण बनवत असताना हळद, जीरं, धणे यांचा जास्तीत जास्त वापर करा.
डायबिटीस असलेल्या रुग्णांनी साखर नसलेल्या च्यवनप्राशचे सेवन करावे.
दिवसातून दोनवेळा हर्बल टी, तुळशी, दालचीनी, कालीमीरी, सुकलेल्या आल्याच्या काढ्याचे सेवन करा.
हळदीचे दूध प्या