>> डॉ. अगम वोरा
देशातील नागरिकांच्या स्वास्थ्याप्रति एखाद्या देशाची बांधिलकी किती दृढ आहे याचा एक मापदंड म्हणजे संभाव्य आणि सध्याच्या आरोग्य समस्यांकडे पाहण्याचा देशातील नेत्यांचा दृष्टिकोन. भारतातील कोविड १९ लसीकरण मोहीम जगातील एक सर्वात भव्य लसीकरण मोहीम ठरली. यातून हेसुद्धा स्पष्ट झाले की, या जागतिक महामारीचा लोकांच्या आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आपले सरकार तयार आहे, सज्ज आहे आणि संपूर्णपणे बांधिलही आहे. कोविड १९ ची लाट ज्या वेगाने भारतात थोपवली गेली ती कामगिरी आपल्या इतिहासातील अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब म्हणून नोंदवली जाईल. मात्र, आता इतर साथीच्या रोगांशी लढण्याची तयारी आपण करायला हवी. असे अनेक आजार आहेत जे विशेषत: प्रौढांसाठी धोकादायक आहेत. हे धोके टाळण्यासाठी फक्त एक उपाय ठोसपणे राबवायचा आहे, आणि तो म्हणजे प्रौढांच्या लसीकरणाला प्राधान्यक्रमावर आणणे.
या जागतिक महासंकटानंतर आपण सगळेच आरोग्याबद्दल अधिक सजग झालो आहोत आणि प्रतिबंधात्मक म्हणजेच आजार होऊ न देण्याच्या प्रयत्नांवर भर देत आहोत. 'हेल्दी एजिंग' किंवा वृद्धापकाळाकडे आरोग्यपूर्ण वाटचाल करणे ही संकल्पना आताशा जोर धरू लागली आहे. प्रौढ आणि वृद्धांनाही कमाल क्षमतांसह चांगल्या दर्जाचे आयुष्य जगावे, असे वाटते. 'हेल्दी एजिंग' आणि प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी लसीकरण हा फार महत्त्वाचा भाग आहे. मात्र, भारतात अद्याप यासंदर्भात आवश्यक अशी जनजागृती झालेली नाही.
आपल्याकडील प्रौढ लोकसंख्या सध्या किती प्रमाणात संरक्षित आहे?
सध्या इन्फ्लुएंझा, न्युमोकोकल आजार, मेनिन्गोकोकल आजार, कांजण्या, टायफॉइड, हेपेटायटिस बी, टिटॅनस आणि पिवळा ताप यासाठीच्या लसी भारतात प्रौढांसाठी उपलब्ध आहेत. तज्ज्ञांच्या मते घटसर्प आणि डांग्या खोकला अशा काही आजारांसाठी लहानपणी घेतलेल्या लसींचे बुस्टर डोस प्रौढांसाठी आवश्यक आहेत. मात्र, या लसी घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. काही सर्वेक्षणांनुसार, प्रौढांमधील लसीकरणाचे प्रमाण भारतात २ टक्क्यांहूनही कमी आहे.
भारतात न्युमोनिया, मेंदूज्वर, इन्फ्लुएंझा, शिंगल्स (एक प्रकारचा त्वचारोग), हेपेटायटिस बी, डांग्या खोकला आणि घटसर्प या आजारांचे प्रमाण प्रचंड आहे. उदाहरणार्थ, जंतूसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणारे ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण न्युमोनिया आणि मेंदूज्वरामुळे दाखल होतात. दरवर्षी आपल्याकडे साथीच्या आजारांची आणि जंतूसंसर्गाची लाट येते. या आजारांमुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वाढते आणि एकूणच सामान्य जनतेचा आरोग्यावरील खर्च वाढतो. शिंगल्ससारख्या आजाराची सुरुवात त्वचेवर साधे पुरळ येण्याने होते. मात्र या आजारामुळे प्रौढ रुग्णाला प्रचंड वेदना होतात आणि काहींना तर आंघोळ करणे, कपडे घालणे, खाणे किंवा इतर दैनंदिन कामे करणेही कठीण जाते. यामुळे रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो. या गंभीर परिस्थितीतील रुपेरी किनार म्हणजे या आजारावरील लस उपलब्ध आहे. या लसीमुळे प्रौढांना संसर्गापासून प्रतिबंधित ठेवून संरक्षण देता येते.
प्रौढांचे लसीकरण ही तातडीची गरज का आहे?
माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतशी त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. शरीरात रोगप्रतिकारक पेशींच्या निर्मितीचा वेग मंदावतो आणि आधीच्या पेशींची लढण्याची क्षमताही कमी होत जाते. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर वृद्ध व्यक्तींना संसर्ग होण्याचा आणि संबंधित आजारांतून अधिकाधिक गुंतागूंत होण्याचा धोका अधिक असतो. वयानुसार प्रौढांमध्ये आणखीही काही धोके संभवतात : हृदयरोग, श्वासाचे आजार आणि मधुमेह यासारखे आजार बळवण्याची शक्यता या वयोगटात अधिक असते. या आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती अधिकच कमकुवत होते आणि परिणामी वृद्ध व्यक्तींना असलेला संसर्गाचा धोका वाढतो.
या प्रकारचे संसर्ग शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करणारे असतातच. पण त्यामुळे आरोग्यसुविधांवरील खर्चातही वाढ होते. भारतासारख्या देशात आजारांचा बहुतांश खर्च रुग्णालाच करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारचे संसर्ग आर्थिकदृष्ट्या मोठा बोजा निर्माण करणारे ठरू शकतात, विशेषत: वृद्ध व्यक्तींच्या संदर्भात.
लसींमुळे हा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास कमी होऊ शकतो. लसींमुळे आपण सुयोग्य पद्धतीने वृद्धत्वाकडे वाटचाल करू शकतो आणि काळजी घेणाऱ्या इतर व्यक्तींवरील आपले अवलंबित्वही कमी होते. लस घेणाऱ्या व्यक्तीला तर लसीचे संरक्षण मिळतेच पण त्याचबरोबर रोगप्रसाराची श्रृखंला त्यामुळे खंडित होते आणि परिणामी साथीच्या रोगांची लाट पसरण्याची शक्यता कमी होते.
प्रौढांचे लसीकरण: आनंदी आणि आरोग्यदायी वृद्धापकाळासाठी
वृद्धापकाळाला 'सुवर्णकाळ' असेही म्हटले जाते. मात्र, जे टाळता येऊ शकतात अशा अनेक आजारांना आपण बळी पडणार असू तर या काळाला सुवर्णकाळ कसे म्हणता येईल? लहान बाळांचे आणि मुलांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय प्राधान्यक्रम मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण काही पावले उचलली. आजघडीला, आपल्याकडे मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण 77 टक्के आहे. सरकार, बालरोगतज्ज्ञ आणि पालक यांच्यातील दृढ समन्वयामुळे आपण हे यश मिळवू शकलो. आता प्रौढांच्या लसीकरणातही याच प्रमाणात यश आणि सहकार्यात्मक बांधिलकी जपण्याची वेळ आली आहे.
यात डॉक्टरांची (हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्स) महत्त्वाची भूमिका आहे. लस घेणे का महत्त्वाचे आहे, किती प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत आणि त्या कशा घेतल्या जाव्यात याबद्दलची माहिती त्यांनी ५० च्या पुढील रुग्णांना द्यायला हवी. वृद्धांनीही डॉक्टरांशी लसींच्या फायद्याविषयी नि:संदिग्धपणे चर्चा करायला हवी. मधुमेह, श्वासाचे आजार हृदयरोग असे गंभीर त्रास असणाऱ्या रुग्णांना तर लस घेण्यास प्रोत्साहन द्यायलाच हवे. शिंगल्सच्या लसीसारख्या काही लसी अद्याप भारतात उपलब्ध नाहीत. मात्र, आपल्याकडील प्रौढांसाठी या लसीही लवकरच उपलब्ध होतील.
वृद्ध, गंभीर आजार असलेले रुग्ण, एचआयव्ही रुग्ण आणि कर्करोगाच्या रुग्णांनीही लसी घ्यायला हव्यात. सणासुदीच्या काळात अशा व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी जाणार असतील तर त्यांनी फ्लूच्या लसीसारख्या लसी घ्यायला हव्यात.
संसर्गामुळे पसरणाऱ्या आजारांवरील सर्वात परिणामकारक उपाय म्हणजे लस. देवीचा रोग आणि पोलिओसारखे आजार समूळ नष्ट करण्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे. आपण आपल्या मुलांना अनेक संसर्गांपासून संरक्षण देण्यात यशस्वी ठरलो आहोत. मात्र, आपल्या प्रौढ लोकसंख्येला असे संरक्षण आपण अजूनही देऊ केलेले नाही. आता प्रौढांना हे संरक्षण देण्याची वेळ आलेली आहे.
(लेखक नामवंत चेस्ट फिजिशियन असून असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाचे मानद सरचिटणीस आहेत.)