नवी दिल्ली - अलीकडच्या काळात ह्दयविकाराच्या झटक्याने निधन होण्याचे प्रमाण वाढत आहे. स्पर्धात्मक युगात, रोजच्या धावपळीत अनेकजण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शरीर अनेक आजारांनी ग्रासले जाते. त्यात कोरोना काळानंतर अचानक होणाऱ्या मृत्यूमागे ह्दयविकाराचा झटका हे प्रमुख कारण आहे. त्यात आता ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दुप्पट असल्याचा रिपोर्ट युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या संशोधकांनी दिला आहे.
या रिपोर्टबाबत डॉ. मारियाना मार्टिनहो म्हणाल्या की, सर्व वयोगटातील स्त्रियांना ज्यांना मायोकार्डियल इन्फेक्शनचा त्रास आहे त्यांची प्रकृती खराब होण्याचा धोका जास्त असतो. या महिलांना नियमितपणे त्यांच्या ह्दयाच्या हालचालींची देखरेख ठेवायला हवी. त्याचसोबत रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी, मधूमेहावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सध्या युवतींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
मागील रिपोर्टनुसार, एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन असलेल्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी राहावे लागते. त्यात महिलांचे वाढते वय, इतर आजार त्याचसोबत ब्लॉक झालेल्या धमन्या उघडण्यासाठी स्टेंटचा कमी वापर हे कारण आढळून आले आहे. स्टडी रिपोर्टमध्ये ८८४ रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सरासरी वय ६२ वर्षे आणि २७ टक्के महिला रुग्णांचा समावेश होता. उच्च रक्तदाब, मधूमेह आणि स्ट्रोक आलेल्या रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. महिला आणि पुरुष रुग्णांवरील उपचार सारखेच होते. परंतु ५५ आणि त्यापेक्षा कमी वयाच्या महिलांना पुरुषांच्या तुलनेने रुग्णालयात उपचारासाठी जास्त कालावधी गेला.
संशोधकांनी महिला आणि पुरुष रुग्णांमध्ये जास्त जोखीम असलेल्या आजारावरून तुलना केली. त्यात मधूमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, ह्दयविकार, किडनी रोग, स्ट्रोकयासारख्या आजारांचा समावेश होता. ३० दिवसांच्या या कालावधीत ११.८ टक्के महिला रुग्णांचा मृत्यू झाला तर त्याच तुलनेने पुरुषांचे प्रमाण ४.६ टक्के इतके होते. त्यामुळे या रिपोर्टनुसार, स्त्रियांना ह्दयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे निष्पन्न झाले. त्याचसोबत मायोकार्डियल इन्फेक्शनबाबत आणखी रिसर्च करणे गरजेचे आहे असं संशोधकांनी सांगितले.