Health Tips : दिवसेंदिवस तापमान वाढू लागले आहे. त्यामुळे जेवणापेक्षा पाण्याचे, फ्रुट ज्यूस, कोल्ड्रिंक यांचे सेवन अधिक केले जाते. मात्र, यापेक्षा जर हंगामी फळे खाल्ली तर पोट भरेलच आणि आरोग्यालाही उपयुक्त ठरतील.
तापमान गेले ३३ अंशांवर?
राज्यभरात सध्याचे तापमान हे ३३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. जे अधेमधे वाढत राहते. यामुळे दिवसा घराबाहेर राहणे नागरिकांना घाम फोडणारे असते.
म्हणून रस न पिता फळे खा...
१) फळांचा रस बनवताना आपण त्याची त्वचा आणि आतील चोथा म्हणजे फायबर काढून टाकतो. अनेक फळांच्या याच भागात जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्त्वे जास्त असतात जी त्यातून वेगळी होतात. फळांच्या रसात मोठ्या प्रमाणात साखर असते.
२) ज्याच्या नियमित सेवनाने मधुमेह जडू शकतो. फळांमुळे पोट जास्त काळ भरते, फास्ट फूड खाणे टाळण्यास मदत होते.
उन्हाळ्यात खाण्याची सुपरफ्रुट कोणती?
आंबा : फळांचा राजा असलेल्या आंब्याचे जगभरात चाहते आहेत. उन्हाळ्यात येणारा थकवा कमी करण्यासाठी कॅलरीयुक्त असलेल्या आंब्याचे सेवन करा. त्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिनसह पोटॅशिअम देखील असते.
काकडी : काकडीत ९५ टक्के पाणी असल्याने तिचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. जर तुम्हाला पुरेसे पाणी पिणे शक्य नसेल तर काकडी नक्कीच खा. कारण त्यात फायबर, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते ज्याने पचनक्रिया सुधारते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी काकडी प्रभावी आहे.
सफरचंद : उन्हाळ्यात सफरचंद खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि हायड्रेशन चांगले होते. सफरचंदात प्रति १०० ग्रॅम सुमारे ८५ ग्रॅम पाणी असते, ज्यामुळे ते एक सुपरफ्रुट असून, कोलेस्ट्रॉल कमी करत हृदयाचे आरोग्य सुधारते.
टरबूज : हे या हंगामातील कमी कॅलरी आणि सुमारे ९२ टक्के पाणी असलेले सर्वोत्तम फळ आहे. त्याच्या सेवनाने शरीराचे हायड्रेशन चांगले राहते. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते तर त्यातील लाइकोपीनसह शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्समुळे पेशींचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.