Summer Care Health Tips : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. वाढत्या उकाड्यामुळे सर्वच जण त्रस्त आहेत. जराही उन्हात बाहेर पडलो तरी सुद्धा अंगाची नुसती लाहीलाही होते. जीव पाणी पाणी करतो. पण, उन्हात कामासाठी तर जावंच लागतं. मग अशा वेळी पाण्याची बाटली खरंतर सोबत ठेवणं हे किती सोपं काम असतं, पण अनेकांना तेवढंही ओझं नकोस वाटतं. आणि मग जीवाची तगमग होते उन्हात तरी पाणी नसतंच प्यायला. कुठूनतरी मग गार पाण्याची बाटली विकत घ्यायची आणि भर उन्हात घटाघटा गार पाणी प्यायचं किंवा मग मिळेल तिथे शीतपेयं प्यायचं किंवा लिंबू सरबत प्यायचं! परिणाम? - व्हायचा तोच होतो..
काय काळजी घ्याल?
१) उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराबाहेर पडताना पाण्याची मोठी बाटली आपल्या सोबत ठेवणं गरजेच आहे. समजा बॅग मोठी नसेल तर, दोन छोट्या बाटल्या ठेवा. ही गोष्ट वाटते छोटी पण, तब्येतीसाठी आवश्यक आहे.
२) भर उन्हात 'चिल्ड' गारेगार पाणी अजिबात पिऊ नका. त्याने घशाचे विकार होतात, अनेकांचे पोटही बिघडतं.
३) सरबत, उसाचा रस पिणार असाल तर, तिथे स्वच्छतेची काय काळजी घेतली जाते ते बघा आणि स्वच्छता असेल तरच प्या. त्यातही बाहेरचा बर्फ टाकून पिऊ नका.
४) भर उन्हात उघड्यावरच्या फ्रूट प्लेट खाऊ नका. फार वेळ चिरुन ठेवलेल्या फळांवर माशा बसतात, त्याने आजार वाढतात.
५) नेहमीचा प्रश्न, कोल्ड ड्रिंक. शक्यतो अजिबात पिऊच नका. त्यामुळे बाकी काही नाही तर, उन्हाळा संपता संपता वजन खूप वाढते. एवढ्या साखरेची आपल्या शरीराला अजिबात गरज नसते. त्यामुळे कोल्ड्रिंक्स पिणं टाळा.
६) घरगुती पारंपरिक सरबतं प्या. फळं खा. आणि डोक्यावर टोपी, रुमाल विसरू नका.
७) ऊन बाधले तर होणारा त्रास, डिहायड्रेशन आणि पोटाचे विकार छळतात.
या आजारांना मिळेल निमंत्रण-
१) लघवीचे प्रमाण कमी होते किंवा लघवी करताना जळजळ होते.
२) थंडी - तापही येणे
३) डोळे लाल होणे
४) कावीळचा धोका वाढतो
५) उलट्या- जुलाबाचा त्रास होतो
शिवाय वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सकस आणि योग्य पद्धतीने आहार घेणं गरजेचं आहे. आबंट, तेलकट पदार्थ खाणं टाळावं. याचा नकळतपणे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.