लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत नोंदविले जात आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये २,२७८ अशी नोंदविण्यात आलेल्या रुग्णात आता या वर्षी आतापर्यंत ३,३२२ एवढे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आता गणपती उत्सवानंतर स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्याने वर्तविली आहे.
यंदा १२ सप्टेंबरपर्यंत राज्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या साथीच्या आजारापूर्वी २०१९ मध्ये नोंदवलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ४४ टक्यांनी वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये २,२७८ एच१एन१ रुग्ण होते. यंदा मात्र १२ सप्टेंबरपर्यंत ३,३२२ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत तर २०१९ यावर्षात याच कालावधीत २४६ मृत्यूंच्या तुलनेत मात्र यंदा १४७ मृत्यू अशी कमी नोंद झाली असल्याची दिलासादायी बाब आहे. दरम्यान यातील ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण पाच जिल्ह्यांतील असून यात ८७० रुग्ण नोंदवून पुणे प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई (३४५), ठाणे (३२७), नागपूर (१९८), नाशिक (१९७) आणि कोल्हापूर (१५५) असे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.
राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लू नोंदवला जात असून स्वाइन फ्लूच्या अधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आधीच्या संसर्गापासून अस्तित्वात असलेली प्रतिकारशक्ती पूर्वीच्या स्ट्रेनच्या संपर्कात आल्याने तयार झालेल्या प्रतिपिंडांना जुमानत नसल्याचा अंदाज त्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
दरम्यान, यावर बोलताना राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या मते सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उच्च जोखमीच्या रुग्णांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणे टाळावीत. उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना कोविडचे योग्य वर्तन पाळावे. इन्फ्लूएंझा सारख्या आजारांनी वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे सुचविले आहे.