रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ काळजी घ्या : सर्दी, खोकल्यासह पोटाच्या विकारांमध्ये वाढ
By admin | Published: August 01, 2016 11:58 PM
जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे.
जळगाव : पावसाळी वातावरणामुळे गारवा वाढण्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डास व माशांचीही संख्या वाढून विविध आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या सोबतच दूषित पाणी व उघड्यावरील अन्न खाल्याने पोटाचेही विकार वाढत आहे. पावसाळा सुरू झाला की, विविध आजारही वाढू लागतात. सध्या कधी जोरदार, तर कधी रिपरिप पडणार्या पावसामुळे शहरातील विविध भागांमधील दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. काळजी न घेता पावसामध्ये भिजल्याने सर्दी, खोकला मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्दीमुळे थंडी, तापाचीही लागण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या प्रचंड आहे. यामुळे लहान मुलांच्या दवाखान्यासह सर्वच दवाखान्यात सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहे. सर्दीच्या रुग्णाच्या संपर्कात इतर कोणी आले तर त्यालाही सर्दीची लागण होत असल्याने रुग्णांची ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. डास व माशांमुळे इतरही आजार... पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचल्याने तसेच जागोजागी पडलेला कचरा कुजल्यामुळे डास व माशांची संंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे हे डास चावून मलेरिया सारखे आजार होत आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांवर माशा बसून ते अन्न खाण्यात आल्याने कॉलरी, पटकी या सारखे आजार वाढत आहे. त्यात गोड पदार्थांवर या माशा जास्त बसतात, ते खाल्याने अधिक त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोटाचे विकार वाढले... दूषित पाणी पिण्यात आल्याने त्यामुळे पोटाचे विकार अधिक होत आहे. यामध्ये डायरिया, जुलाब तसेच कावीळचेही रुग्ण आढळून येत आहे. यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन केेले जात आहे. दवाखाने फुल्ल....रुग्ण वाढल्याने सध्या दवाखाने फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांची संख्या २० ते २५ टक्क्याने वाढली आहे. अशी घ्या काळजी-पावसात रेनकोट, छत्री वापरुन भिजणे टाळा - गारवा वाढल्यास उबदार कपडे घाला- उघडे व शिळे अन्न खाऊ नका -भाजीपाला, फळे धूऊन घ्या -पचनास हलके असणारेच पदार्थ खा. ---- वातावरण बदल्याने व पावसात भिजल्याने सर्दी, खोकला, थंडी-तापाचे रुग्ण वाढत आहे. सोबतच डास व माशांची संख्या वाढल्याने तसेच दूषित पाणी प्यायल्याने मलेरिया, डायरिया, जुलाब या सारखे आजारही वाढत आहे. यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. -डॉ. डी.आर. जयकर.