धावा आणि निर्णय क्षमता वाढवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 5:40 PM
रोज धावल्याने शरीर सुदृढ होते हे आपणास माहितच आहे. मात्र धावण्याच्या व्यायामाने निर्णय क्षमतेतही वाढ होते हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
रोज धावल्याने शरीर सुदृढ होते हे आपणास माहितच आहे. मात्र धावण्याच्या व्यायामाने निर्णय क्षमतेतही वाढ होते हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या अॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानूसार दररोज धावण्याचा व्यायाम करण्यामुळे मेंदूला चालना मिळते. तसेच त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता वाढत असल्याचे जाहीर केले आहे. संशोधनात नियमित धावण्याचा व्यायाम करणाऱ्या आणि कोणताही शारीरिक व्यायाम न करणाऱ्या तरुणांचा अभ्यास करण्यात आला आहे. नियमित धावण्याचा व्यायाम केल्यामुळे अल्झायमर तसेच मेंदूशी संबंधित आजार दूर होण्यास काही प्रमाणात मदत होत असते. याचे काही परिणाम कालांतरानेही दिसतात असे संशोधकांनी म्हटले आहे. हे संशोधन ह्युमन न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रामुख्याने तरुणांमध्ये धावण्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम संशोधकांनी यामध्ये अभ्यासला आहे. यासाठी त्यांनी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) तंत्रज्ञानाचा वापर केला. संशोधनात सहभागी करून घेण्यात आलेल्या तरुणांचे वय १८ ते २५ या दरम्यान होते.रोज धावण्याचा व्यायाम करण्यामुळे मेंदूचा शरीराशी असणारा संपर्क वाढतो अथवा मेंदू अधिक कार्यशील होण्यास मदत होते. धावण्यामुळे समोरील भागात असणारा मेंदू यामुळे अधिक कार्यशील होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढणे, योग्य नियोजन करणे, काम करत असताना लक्ष सतत केंद्रित करण्यास मदत होत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.