हसमुख जोडीदारामुळे वाढते आरोग्य आणि आयुष्यमान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 4:00 PM
हसमुख जोडीदारामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनतो ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
हसमुख आणि मनाने आनंदी राहणारा जोडीदार असेल तर आपले आरोग्य तर सुधारतेच, सोबत आनंद द्विगुणित होऊन आयुष्यमान वाढते. संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनानुसार आनंदी आणि हसमुख जोडीदारामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनतो ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.‘मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी’ येथील सहायक प्राध्यापक विल्यम चॉपिक यांनी माहिती दिली की, आमच्या अभ्यासातून आनंद आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध कसा असतो यावर अधिक प्रकाश टाकण्यात आला आहे. नातेसंबंध आणि जोडीदाराचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचासुद्धा यामध्ये विचार करण्यात आला आहे.प्रस्तुत संशोधनात १९८१ मध्यम-वयीन जोडप्यांचा सामावेश करण्यात आला होता. अध्ययनाअंती निष्कर्ष निघाला की, ज्यांचे जोडीदार अधिक आनंदी असतात त्यांचे आरोग्य वयानुरूप अधिक चांगले असते. एकमेकांच्या साथीने दोन्ही जोडीदार ‘आनंद निर्देशांकावर’ चांगले गुण मिळवतात. आनंदी लोकांचे आरोग्य चांगले असते, असे पूर्वी करण्यात आलेल्या विविध संशोधनातून दिसून आलेले आहे. परंतु यापुढे एक पाऊल जात चॉपिक व सहकाऱ्यांनी जोडीदारासोबत असलेल्या नात्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.ते सांगतात की, आनंदी जोडीदार आपल्याला अधिक बळकट सामाजिक आधार देतात (जसे की, काळजी घेणे). उलटपक्षी नाखुष किंवा असमाधानी जोडीदार केवळ वैयक्तिक तणावावर लक्ष केंद्रित करतात. अशा स्थितीतच आनंदी जोडीदार फार गरजेचा असतो.कारण ते आपल्याभोवती आरोग्यास पोषक असे वातावरण निर्माण करतात. झोपेचे टाईम मॅनेजमेंट, सकस आहार, व्यायाम, व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा देणे यापद्धतीने ते आपल्या चांगल्या आरोग्यास कारणीभूत ठरतात. संशोधनात ५० ते ९४ वयोगटातील जोडप्यांची सहा वर्षांच्या कालावधीत आनंद, वैयक्तिक आरोग्य आणि शारीरिक हालचाल याविषयी माहिती गोळा करण्यात आली होती. ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’ने त्याचे निष्कर्ष ‘हेल्थ सायकोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत.