जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळवलेल्या पी. व्ही. सिंधूने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सिंधूने सर्व सामने सहज जिंकले. स्वित्झर्लंडमधील बासेलमध्ये रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-7, 21-7 असे पराभूत केले.
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत. बॅडमिंटन कोर्टमध्ये सिंधू आपल्या वेगवान शॉर्ट्ससाठी ओळखली जाते. अनेक मोठे मोठे प्लेअर्सही तिच्यासमोर टिकत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का? सिंधूच्या धडाकेबाज खेळीमागील गुपित म्हणजे, तिची फिटनेस आहे. 24वर्षांची सिंधू आपली फिटनेस आणि स्टॅमिन्याचा खास काळजी घेते. तिला फिट अन् फाइन करण्यासाठी तिचे कोच पी गोपीचंद हे फार मेहनत घेत असल्याचे सांगितलं जातं. परंतु, त्यांच्यासोबतच तिच्या फिटनेसची काळजी तिचे वडिल पीव्ही रमन्ना आणि तिची आई विजयलक्ष्मी घेतात.
असं आहे पीवी सिंधूचं डेली रूटीन
सिंधूच्या दिवसाची सुरुवात सकाळी 3:30 वाजता होते. त्यानंतर सकाळी 4:30 ते 6:30 पर्यंत गोपीचंद अकादमीत सरावासाठी जाते. दोन तासांच्या सरावानंतर सिंधू थोडा वेळ आराम करते. त्यादरम्यानचा वेळ ती ब्रेकफास्ट करते.
सिंधू सकाळी 8.30 ते 12.30 पर्यंत पुन्हा सराव करते. यादरम्यान ती अर्धा तास आरामही करते. त्यानंतर ती लंच करते आणि साधारणतः 3 तास घरीच आराम करते. त्यानंतर पुन्हा सिंधू संध्याकाळी 4 वाजता कोर्टवर सरावासाठी जाते.
सिंधुचं डाएट...
भारताची फुलराणी सिंधू आपल्या फिटनेसची फार काळजी घेते. तसेच आपल्या आहारात ती फक्त हेल्दी पदार्थांचाच समावेश करते. तिच्या फिटनेससाठी घातक असणाऱ्या पदार्थांना सिंधू शक्य तेवढं लांबच ठेवते. सिंधूला बिर्याणी फार आवडते. एका इंटरव्यूमध्ये सिंधूने सांगितलं होतं की, 'मला बिर्याणी फार आवडते. पण मी नेहमी ती खाऊ शकत नाही. त्यामुळे डाएटमध्ये कुठेही खंड पडू न देता जेव्हाही मला संधी मिळते. तेव्हा मी बिर्याणी पोटभर खाऊन घेते.'
सिंधू सकाळी 3.30 वाजता उठल्यानंतर बिनासाखरेचं दूध पिते आणि त्यानंतर सरावासाठी जाते. सराव संपवून परतल्यानंतर ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन पावडर आणि फळांचा समावेश करते. सिंधू नाश्त्यामध्ये हाफ बॉइल्ड अंडी खाणं पसंत करते. नाश्त्यानंतर सिंधू कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट्सही खाते.
सिंधूचं लंच नॉर्मल असतं आणि त्यामध्ये ती शाकाहारी पदार्थांचा समावेश करते. सिंधू रात्री 8.30 वाजता डिनर करते. डिनरमध्ये काही हेल्दी पदार्थांचा समावेश करते. परंतु, त्यामध्ये मांसाहारी पदार्थांचाही समावेश असतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.