भारतीय तरुणांमध्ये हृदय विकारांची समस्या वेगाने वाढत असून वेळीच यावर उपाय केला गेला नाही तर अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो, असे हृदयरोग तज्ज्ञ आणि मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चिकित्सक डॉ. नित्यानंद त्रिपाठी यांनी एनबीटी वेबसाइटला सांगितले. ते म्हणाले की, 'भारतात हृदय रोगाची माहामारी रोखण्यासाठी लोकांना शिक्षित करणे हा एकमेव उपाय आहे. असे न झाल्यास २०२० पर्यंत सर्वाधिक मृत्यू हृदय रोगाच्या कारणाने होतील'.
'या' कारणाने हृदय रोगाचा धोका
डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले की, 'हृदय रोग हे केवळ वय जास्त असल्यावर होतात असे आधी मानले जात होते. पण आता जास्तीत जास्त तरुणाई हृदय रोगाच्या जाळ्यात अडकली जात आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये वाढत्या तणावामुळे हृदय रोगांचा धोका वाढला आहे. याची इतरही काही कारणे आहेत पण तरुणांमध्ये जास्तीत जास्त हृदय रोगाची कारणे म्हणजे अधिक तणाव, सतत काम करणे आणि पुरेशी झोप न घेणे ही आहेत. धुम्रपान आणि चैनीच्या जीवनशैलीमुळे २० ते ३० वयोगटातील तरुणांना हार्ट अटॅकचा धोका वाढतो आहे'.
ओपन हार्ट सर्जरीमध्ये वाढ
देशातील वेगवेगळ्या हार्ट हॉस्पिटल्समध्ये २ लाखांपेक्षा जास्त हार्ट सर्जरी केल्या जातात आणि यात वर्षांला २५ टक्क्यांनी वाढ होत आहे. पण ही सर्जरी केवळ ती वेळ मारुन नेण्यासाठी असते. हृदय रोगामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लोकांना हृदय रोग आणि त्यातून होणाऱ्या त्रासाबाबत जागृत करणे फार गरजेचे आहे.
हृदय रोगाची लक्षणे एकसारखी नसतात
त्यांनी सांगितले की, 'सर्वच हृदय रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये एकसारखी लक्षणे नसतात आणि छातीत वेदना होणे हे याचं सर्वात सामान्य लक्षण आहे. काही लोकांना अपचनाची समस्या होते. काही लोकांना जडपणा आणि अस्वस्थ वाटू लागतं. सामान्यत: छातीत वेदना होतात, या वेदना नंतर काखेत, मानेत आणि पोटपर्यंत होतात. त्यासोबत हृदयाचे ठोके वाढणे आणि श्वास घेण्यास समस्याही होते. अशातच हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. हृदय विकाराच्या झटका येत असताना घाम येणे, चक्कर येणे, मळमळ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या होतात.
या लोकांना अधिक धोका
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, राग, चिडचिड यामुळे रक्तदाब वाढतो. डिप्रेशनने ग्रस्त लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता 4 पटीने जास्त असते. तणाव हा हृदयासाठी फारच घातक असतो. डिप्रेशनमुळे हृदयाचा आजार गंभीर रूप धारण करतो. अनेकदा हे जीवघेणंही ठरू शकतं. एका शोधानुसार, हृदय रोगाच्या प्रत्येक 5 रुग्णांपैकी एकाला गंभीर डिप्रेशनची समस्या असते.