भारतीयांच्या खाण्या-पिण्यातून व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असल्याचं बघण्यात आलं आहे. व्हिटॅमिन ए, सी, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांबाबत उत्तर भारतात फार दुर्लक्ष केले जात आहे. तर दक्षिण भारतात व्हिटॅमिन बी १ ची सर्वात कमतरता दिसून आली. तसेच व्हिटॅमिन बी २ ची कमतरता पश्चिम भारतात आढळून आली.
डॉयग्नॉस्टिक चेन एसआरएल डॉयग्नॉस्टिकच्या साडे तीन वर्षांच्या ९.५ लाखांपेक्षा अधिक नमुन्यांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष समोर आले आहे. महिला आणि पुरुषांवर आधारित या विश्लेषणात हे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन ए, बी २ आणि बी ६ ची सर्वाधिक कमतरता महिलांमध्ये तर पुरुषांमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी १२ ची कमतरता आढळून आली आहे.
वेगाने होणारं शहरीकरण, बदलती लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे भारतीयांमध्ये पोषक तत्वांची कमतरता आढळून आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणाने हे स्पष्ट केले आहे की, व्हिटॅमिन ए, सी, बी १, बी ६, बी १२ आणि फोलिक अॅसिड यांची ज्याप्रकारची कमतरता आहे त्यातून गंभीर आजार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसआरएलच्या विश्लेषणातून हे समोर आले आहे की, व्हिटॅमिनची कमतरता देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक उत्तर भारतातील लोकांमध्ये आहे.
या अभ्यासाशी संबंधित डॉ. बी. आर. दास यांनी सांगितले की, 'भारतात चारही भागांमध्ये व्हिटॅमिन सी, बी १, बी २, बी १२ आणि फोलिक अॅसिडती कमतरता असण्याची समस्या ३१ ते ४५ वयांच्या लोकांमध्ये आहे. प्रवास करताना काही खाणे, फास्ट फूड खाणे आणि रोजच्या आहारात पोषक फळे आणि भाज्या नसणे ही याची कारणे असू शकतात. याने आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं'.