भारतात कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सबव्हेरिएंटने (Omicron Sub Variant BA.4 in India) शिरकाव केला आहे. देशात याचा पहिला रुग्ण सापडला आहे. हैदराबादमध्ये हे पहिलं प्रकरण समोर आलं आहे. कोविड-19 जिनोमिक सर्विलान्स प्रोग्राममुळे याची माहिती मिळाली आहे.
भारताच्या SARS-CoV-2 कन्सोर्टियम ऑन जीनोमिक्सशी (INSACOG) संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितलं की, भारतातील BA.4 सब व्हेरिएंटची नोंद ९ मे रोजी GISAID वर करण्यात आली आहे. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे.
तज्ज्ञांच्या मते, या वर्षी जानेवारीत भारतात आलेल्या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटच्या लाटेमुळे भारतातील लोकांमध्ये चांगली आणि व्यापक प्रमाणात इम्युन रिस्पॉन्स पाहायला मिळाला. ज्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमिक्रॉनचा BA.4 आणि BA.5 सब व्हेरिएंट जगभरात कोरोनाची प्रकरणं वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. १२ पेक्षा जास्त देशात हा सापडला आहे.
सीएनबीसीच्या मते, कोरोनाच्या WHO मधील टेक्निकल प्रमुख मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कमीत कमी १६ देशांत BA.4 चे जवळपास 700 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. BA.5 चे ३०० पेक्षा अधिक प्रकरणं १७ देशांत आहेत. कोरोनाचे हे सब व्हेरिएंच अधिक संसर्गजन्य आहेत पण तितके घातक ठरले नाहीत.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की येत्या दिवसात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये जास्त वाढ होण्याची आशा नाही गंभीर कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढेल याची शक्यताही कमी आहे.