तेलंगणाचे मंत्री के. तारका रामराव यांनी आज सकाळी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली, भारताची पहिली कोरोना लस बनवण्याचं काम भारत बायोटेककडून केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री केटीआर यांनी कंपनीच्या संचालकांसोबत कोरोना लसीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. यावेळी भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एला यांनी कोरोना लसीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले.
कृष्णा एला म्हणाले की, आम्हाला लस बनवण्याचा खूप चांगला अनुभव आहे, कोवाक्सिन या लसीबाबत यूएस आणि जागतिक आरोग्य संघटनाही पाठबळ देत आहेत, आम्ही या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी एकत्र मुकाबला करत आहोत. वॉटर बॉटलपेक्षा कमी किंमतीत कोरोनावरील लस देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितले.
कोवाक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली त्यांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रतिकूल परिणाम झाल्याची तक्रार नाही. डॉक्टरांनी १४ दिवसांपूर्वी डोस दिलेल्या स्वयंस्वेवकांना आता दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. तर कोवाक्सिन लस ही २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात उपलब्ध होऊ शकेल असा विश्वास भारत बायोटेकने व्यक्त केला आहे.
दरम्यान, जगात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या बाबतीत रशिया सर्वांच्या पुढे आहे. रशिया ऑक्टोबर महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरण कार्यक्रमाला सुरू करणार आहे. ज्या अर्थी रशिया, असा दावा करत आहे, त्या अर्थी त्या कोरोनावरील लस तयार करण्याच्या बाबतीत इंग्लंड, अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले, असेच म्हणावे लागेल.
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण ६६.३४ टक्के इतके आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३८ हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात जवळपास २ कोटी लोकांची चाचणी करण्यात आली आहे. २४ तासात साडेसहा लाखाहून अधिक कोरोना टेस्ट झाली आहे. सध्या भारतात दोन कंपन्या कोरोना लसीची चाचणी करत आहेत. यात भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत अशी माहिती आयसीएमआरनं दिली आहे.