इन्फ्लूएंजा एक व्हायरस आहे, जो श्वसनाशी निगडीत एक संसर्गजन्य रोग आहे. इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनची सुरुवात खोकला, सर्दी आणि ताप यांसारख्या लक्षणांनी होते. इन्फ्लूएंजा व्हायरस आपल्या शरीरामध्ये नाक, डोळे आणि तोंडामार्फत प्रवेश करतात. याव्यतिरिक्त या व्हायरसने पीडित व्यक्ती खोकल्यामुळे किंवा शिकल्यामुळे इतर व्यक्तींनाही याची लागण होते. त्यामुळे हा व्हायरस पसरू शकतो. जर याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे निमोनिया, कानाच्या समस्या, सायनसचा त्रास इत्याही समस्यांचा धोका वाढतो.
लक्षणं :
1. थकवा येतो
इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे झालेल्या इन्फेक्शनमुळे थकवा जाणवतो आणि शरीर अस्वस्थ वाटतं. याव्यतिरिक्त शरीराला कमजोरी जाणवते. एवढचं नाही तर थोडंसं काम केल्यानंतर किंवा चालल्यावर चक्कर येते.
2. थंडी वाजणं आणि ताप येणं
या व्हायरसमुळे थंडी वाजण्यासोबतच तापही येतो. ताप कमी किंवा जास्त असू शकतो. व्हायरस वाढल्यानंतर तापही वाढतो.
3. गळ्यामध्ये कफ जमा होणं
इन्फ्लूएंजा व्हायरसमध्ये गळ्यामध्ये कफ जमा होतो. ज्यामुळे काहीही खाताना आणि गिळताना त्रास होतो. श्वास घेण्यासाठी त्रास होतो. तसेच यामुळे शिंका येतात.
4. अंगदुखीचा त्रास सहन करावा लागतो
इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे पीडित असणाऱ्या व्यक्तींना डोकेदुखीच्या त्रासालाही सामोरं जावं लागतं. याव्यतिरिक्त स्नायूंमध्येही वेदना होतात. या व्हायरसमुळे त्वचा पिवळसर दिसू लागते.
असा करा बचाव :
1. पेय पदार्थांचा समावेश करा
व्हायरसमुळे ताप येतो. परिणामी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहारात जास्त पेय पदार्थांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. तसेच सायनसपासूनही सुटका होते.
2. गरम पाण्याचा वापर करा
इन्फ्लूएंजा व्हायरसने पीडित लोकांनी गरम पाण्याने आंघोळ करणं गरजेचं असतं. त्यामुळे कफ कमी होण्यास मदत होते. तसेच वाफ घेणंही अत्यंत उपयोगी ठरतं. वाफ घेतल्याने श्वास घेताना होणारा जाणवणारा त्रास कमी होतो.
3. ओव्याचं पाणी प्या
ओवा पाण्यामध्ये एकत्र करून उकळून घ्या आणि ते पाणी प्या. तसेच साधं पाणीही उकळूनच पिणं गरजेचं असतं.
4. स्वच्छतेवर लक्ष द्या
इन्फ्लूएंजा व्हायरस इन्फेक्शन झाल्यावर सर्वात आधी स्वच्छतेवर लक्ष द्या. जसं जेवण्याआधी हात धुणं गरजेचं असतं. तसेच शरीराला अधिकाधिक आराम द्या.
5. शिळे अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळा
इन्फ्लूएंजा व्हायरस इन्फेक्शन झाल्यानंतर शिळ्या अन्नपदार्थांपासून दूर रहा. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
6. डॉक्टरांचा सल्ला घ्या
ताप आल्यानंतर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीमध्ये होणाऱ्या वेदना, श्वास घेताना होणारा त्रास यांसारखी लक्षणं दिसल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.