लंडन - धकाधकीची जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो. जगभरात मधुमेहाची समस्या सर्वत्र निर्माण होत आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो. मधुमेही रुग्णांची संख्या वाढत असल्याने इन्सुलिनला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र येत्या काही वर्षांमध्ये इन्सुलिनची कमतरता भासू शकते. इन्सुलिनला असलेली मागणी आणि त्याची किंमत कमी न झाल्यास 2030 पर्यंत मधुमेहाचे 4 कोटी रुग्ण औषधापासून वंचित राहणार असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
10 टक्के लोकसंख्या मधुमेह आजाराने ग्रस्त
1980 मध्ये जगातील 5 टक्के लोकसंख्या मधुमेह या आजाराने ग्रस्त होती. मात्र आता ही संख्या दुप्पट झाली आहे. मधुमेह हा आजार मोठ्यांबरोबरच सर्व वयोगटांमध्ये आढळत आहे. फास्टफूडचे अतिसेवन, अपूर्ण झोप, न पेलणारे ताणतणाव या गोष्टींमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेहामुळे दृष्टिपटलावरील (रेटिना) रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. तसेच प्रामुख्याने हृदयविकाराचा धोकादेखील संभवतो. मधुमेही रुग्णांना रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, मेंदूचा विकार, किडनी विकाराचा त्रास जाणवतो. मधुमेहाचे दोन प्रकार असतात. एक टाइप वन आणि दुसरं टाइप टू डायबिटीज. तर टाइप टू डायबिटीज प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो.
2030 मध्ये 20 टक्के अधिक इन्सुलिनची गरज भासणार
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पुढील 12 वर्षात टाइप टू डायबिटीज रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी 20 टक्के अधिक इन्सुलिनची गरज भासणार आहे. मात्र मधुमेहीच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने 2030 पर्यंत जगभरातील 7 कोटी 90 लाख टाइप टू डायबिटीजच्या रूग्णांपर्यंतही इन्सुलिन पोहचणार नाही. स्टॅन्फोर्ड विद्यापीठाचे डॉ. संजय बासू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये इन्सुलिनची कमतरता सर्वात जास्त भासत आहे.