मुंबई : अनेकदा तुम्ही कुणाला तरी तक्रार करताना ऐकलं असेल की, तो रोज योगाभ्यास करतो पण त्याला त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाहीये. पण अधिक वेळ योगाभ्यास केल्याने किंवा कधीही केल्याने त्याचा फायदा होत नाही. तज्ज्ञांनुसार, योगाभ्यास ठराविक वेळेतच करायला हवा. चला जाणून घेऊया योगाभ्यास कधी? किती? करावा याच्या काही खास टिप्स....
1) कधी करावा?
एक्सपर्टनुसार, योगाभ्यास करण्याची योग्य वेळ ही पहाटे 4 ते 7 वाजता असते. जर सकाळी योगाभ्यास करणं शक्य नसेल तर सायंकाळीही सराव करु शकता. योगासने कधीही करा पण जेवण केल्याच्या 4 तासांनंतर योगाभ्यास करावा.
2) कसे कपडे परिधान करावे?
योगाभ्यास करताना नेहमी सैल कपडे परिधान करावे. यामुळे योगासनांचा अभ्यास करताना कपड्यांमुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सूती कपडे असल्यास फारच उत्तम.
3) कसं असावं डाएट?
योगाभ्यास सराव करत असाल तर पचणास हलके पदार्थ खावेत. भाज्या, डाळ, सॅलड आणि रोज किमान एक फळ नक्की खावे. यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्स सुद्धा मिळतात.
4) कसे असावे वातावरण?
योगाभ्यास करण्यासाठी शांत, प्रसन्न आणि शक्य असल्यास हिरवळ असलेले ठिकाण निवडावे. तसे नसेल तर मोकळ्या जागेत कुठेही तुम्ही योगासने करू शकता. अशी जागा निवडा जिथे तुम्हाला ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळेल.
5) किती योगाभ्यास करावा?
योगाभ्यासाची सुरुवात वॉर्मअपने करावी. प्रत्येक आसनं करताना मधल्या वेळेत काही मिनिटांची विश्रांती घ्यावी. स्वतःच्या क्षमतेनुसार आसनांची अंतिम स्थिती धारण करावी, व सरावानुसार आवर्तनं आणि अंतिम स्थिती टिकवण्याची वेळ वाढवावीत. योग प्रशिक्षकांसोबत चर्चा करुन आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योगाभ्यासाचा वेळ ठरवू शकता.
6) कधी दिसायला लागतो फरक?
नियमित आणि योग्य प्रकारे योगाभ्यासक केल्यासच याचा फायदा दिसून येतो. शरीरातील थकवा नाहीसा होतो, ऊर्जा वाढते, नैराश्य कमी होते, अशी सकारात्मक लक्षणे नियमित सराव केल्यानंतरच दिसतात.
7) कधी करु नये योगाभ्यास?
जेवणानंतर लगेचच योगाभ्यास करू नये.कोणत्याही प्रकारच्या शारीरिक वेदना होत असेल तर योगाभ्यास करणं टाळावं.मासिक पाळीदरम्यान योगाभ्यास करु नये. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असल्यास योग प्रशिक्षकाच्या सल्ल्यानंतरच योगाभ्यास करावा.