(Image Credit : Fusion BodyWorks)
आपण सर्वचजण निरोगी आरोग्यासाठी झटत असतो. ताण आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी अनेकजण बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा आधार घेतात. तर काहीजण जिममध्ये तासन्तास घाम गाळतात. पण तुम्हाला माहीत आहे का? या सर्वांपेक्षा योगा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. योगाभ्यासामुळे श्वासावर नियंत्रण ठेवण्यासोबतच शरीर लवचिक करण्यासाठीही मदत होते. योगा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो, हे अगदी खरं आहे. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने योगासनं करत असाल तर फायदेशीर ठरणारा योगा तुमच्या समस्याही वाढवू शकतो.
आज संपूर्ण जगभरामध्ये आंतराष्ट्रीय योग दिवस ( International Day of Yoga) साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. योगाभ्यास करताना कोणत्या चुका टाळ्याव्यात त्याबाबत...
योगा करण्याआधी जेवण करू नका
योगाभ्यास करण्याआधी जवळपास 2 ते 3 तास आधी काहीही खाणं टाळा. कारण जर तुम्ही काहीही खाऊन योगा करत असाल तर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. कदाचित उलटीही होऊ शकते. दरम्यान, शरीराला अन्न पचवण्यासाठी फार एनर्जी लागते. ज्यामुळे तुम्हाला योगाभ्यास करताना फार थकवा जाणवू लागतो.
जखम झाल्यानंतर योगाभ्यास करणं टाळा
जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकाची जखम असेल किंवा तुम्हाला काही लागलं असेल. तसेच तुम्हाला योगा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर, योगाभ्यास करू नका.
योगाभ्यास करताना मोबाईलपासून दूर रहा
योगा करताना तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष इतर गोष्टींपासून दूर ठेवू आपल्या योगाभ्यासावर केंद्रित करा. मोबाईलला योगा क्लास किंवा योगाभ्यास करतान तुमच्यापासून दूर ठेवा. कारण त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं.
कपड्यांची योग्य निवड
योगाभ्यास करताना योग्य कपड्यांची निवड करा. योगाभ्यास करताना जर आपले कपडे टाइट असतील किंवा त्या कपड्यांमध्ये घाम शोषून घेण्याची क्षमता नसेल तर, तुम्ही फार अनकन्फर्टेबल असाल. त्यामुळे तुमचं लक्ष योगाभ्यासावर कमी आणि कपड्यांकडे जास्त जाण्याची शक्यता असते.
योगाभ्यासादरम्यान कोणाशीही गप्पा मारू नका
खरं तर आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींसोबत गप्पा मारणं एक चांगली गोष्ट आहे. परंतु, योगा क्लासमध्ये तुम्ही जेवढं कमी बोलाल तेवढं तुमच्यासाठी उत्तम राहिल. कारण यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं. इतर लोकंही आपल्या योगाभ्यासाकडे लक्ष देऊ शकणार नाही. परिणामी त्यांना आणि तुम्हाला कोणालाच योगाभ्यासाचा पुरेपुर फायदा घेता येणार नाही.
टॉवेल सोबत ठेवणं विसरू नका
योगा क्लासमध्ये टॉवेल किंवा रूमाल स्वतःसोबत ठेवाच. त्यामुळे येणारा घाम पुसण्यास मदत होईल.
जोशमध्ये योगाभ्यास करू नका
उत्साहामध्ये येऊन कोणतीही मुद्रा जमत नसतानाही जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुम्हाला चमकही भरू शकते. त्यामुळे योगाभ्यास करताना कोणतीही मुद्रा हळूहळू आणि शरीरिला जमेल तेवढचं करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.