International Yoga Day 2024: २१ जून रोजी इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जातो. सध्याच्या लाइफस्टाईलमध्ये योगाभ्यास करणं एक गरजही आहे. पण योगाभ्यास करायचा असेल तर काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे योगाभ्यास करण्याआधी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
कधी करावा?
एक्सपर्टनुसार, योगाभ्यास करण्याची योग्य वेळ ही पहाटे ४ ते ७ वाजता असते. जर सकाळी योगाभ्यास करणं शक्य नसेल तर सायंकाळीही सराव करु शकता. योगासने कधीही करा पण जेवण केल्याच्या ४ तासांनंतर योगाभ्यास करावा.
कसे कपडे परिधान करावे?
योगाभ्यास करताना नेहमी सैल कपडे परिधान करावे. यामुळे योगासनांचा अभ्यास करताना कपड्यांमुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सूती कपडे असल्यास फारच उत्तम.
किती योगाभ्यास करावा?
योगाभ्यासाची सुरुवात वॉर्मअपने करावी. प्रत्येक आसनं करताना मधल्या वेळेत काही मिनिटांची विश्रांती घ्यावी. स्वतःच्या क्षमतेनुसार आसनांची अंतिम स्थिती धारण करावी, व सरावानुसार आवर्तनं आणि अंतिम स्थिती टिकवण्याची वेळ वाढवावीत. योग प्रशिक्षकांसोबत चर्चा करुन आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योगाभ्यासाचा वेळ ठरवू शकता.
योग्य ताळमेळ
योगाभ्यास करताना आसनात ताळमेळ अनेकजण ठेवत नाहीत. आपल्या मनाने कधी कमी तर कधी जास्त वेळ आसन केलं जातं. इतकेच नाही तर काही लोक सतत काही दिवस योगाभ्यास करतात आणि काही दिवस करत नाहीत. असं केल्याने शरीरावर सकारात्मक प्रभावाऐवजी नकारात्मक प्रभाव पडू लागतो. त्यामुळे अंगदुखीसारखी समस्या होऊ होते.
आसनात जबरदस्ती
योगाभ्यास करताना कधीही शरीरासोबत जबरदस्ती करू नये, कारण असं करून तुम्ही तुमच्या शरीराच्या मसल्स आणि नसांवर उगाच ताण देत असता, जे फारच घातक ठरू शकतं. योगाभ्यास करताना जेवढं शक्य असेल तेवढच वाका किंवा हाता-पायांना ताणा.
श्वास घेण्याची पद्धत
योगाभ्यासात श्वास योग्यप्रकारे घेणे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करणे फार महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तसं न केल्यास शरीराला कोणताही फायदा मिळत नाही. जसे की, आसन करताना समोर वाकतेवेळी श्वास बाहेर आणि मागे होता श्वास आत घेतला पाहिजे. सोबतच श्वासावर लक्ष केंद्रीत करण ही सुद्धा एक कला आहे. जर तुम्ही लागोपाठ श्वास घेणार नाही तर तुमच्या मांसपेशींपर्यंत ऑक्सिजन पोहचणार नाही.
खाणं-पिणं आणि योगाभ्यासात अंतर
जेवण आणि योगाभ्यास यात कमीत कमी ३ तासांचं अंतर असणं फार गरजेचं आहे. तसेच अनेकदा योगाभ्यास करताना लोक मधेच पाणी पितात, असं अजिबात करू नये. कमीत कमी १ तासानंतरच पाणी प्यावे. योगाभ्यास करण्याच्या एक तास आधी पाणी बंद करा.