सध्याच्या इन्स्टंट जगात उपायदेखील इन्स्टंट असेच लागतात. त्यात वजन कमी करायचं असेल तर आपण जे जे शक्य आहे ते करतोच. सुडौल शरीर आणि त्याही पुढे सिक्स पॅक ऍब्स हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं ह्यासाठी सगळेच धडपडतात. वजन कमी करण्यासाठी लोक दोन प्रकार करतात एक म्हणजे व्यायाम आणि दुसरं म्हणजे डाएटिंग अर्थात, आहार नियंत्रण. डाएट करताना अनेकदा चहा-कॉफी पिणं थांबवायला सांगितलं जातं. पण आम्ही जर तुम्हाला म्हटलं की एक कॉफी आहे ती पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता तर?, पटत नाही ना? मग ही बातमी वाचा. ओन्ली माय हेल्थ डॉट कॉमनं याबाबतची माहिती दिली आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने केलेल्या अभ्यासात असं दिसून आलंय की कॉफीमध्ये लोणी घालून कॉफी प्यायल्यास वजन कमी करण्यास ती फायदेशीर ठरते. व्यायामादरम्यान शरीराची होणारी झीज,थकवा दूर करण्याचे काम बटर कॉफी तत्काळ करते. परंतु, बटर कॉफीचं नियमित सेवन करण्यापूर्वी त्यातली घटकद्रव्य, पोषणमूल्य जाणून घेणं आवश्यक आहे. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या निरीक्षणानुसार एक कप बटर कॉफीत कॅलरी – 445, कार्बोहायड्रेट्स– 0 ग्रॅम, एकूण फॅट:- 50 ग्रॅम, सोडियम आरडीआयच्या 9%, व्हिटॅमिन ए आरडीआयच्या 20% हे घटक असतात. बटर कॉफीत प्रोटिन्स आणि फायबरचं प्रमाण नगण्य असतं. बटर कॉफीत कॅलरीज आणि फॅटचं प्रमाण हे खूप असल्यानं दीर्घकाळासाठी पोट भरल्यासारखं वाटतं. अर्थातच, त्यामुळे जादाचं खाणं कमी होतं. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी बटर कॉफी पिणं फायद्याचं ठरतं. म्हणजे तुम्ही कॉफी पण पिऊ शकता आणि वजनही कमी होतं.
वजन कमी करण्यासाठी केल्या जाणार्या उपायांमध्ये योगा आणि व्यायाम हे आहेतच, पण हे करणाऱ्यांनी बटर कॉफीचं सेवन केल्यास त्यांचे परिणाम लवकर दिसून येतात. बटर कॉफी पिण्यामुळे शरीरातली ऊर्जेचे प्रमाण संतुलित राहून व्यायाम करताना थकवा जाणवत नाही. बटर कॉफीतल्या एमसिटी तेलामुळे शरीरातली ऊर्जा संतुलित राहतेच आणि पथ्य करणार्या (Diet Conscious Food) लोकांना भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं. वजन वाढण्याला आळा बसतो.
प्रेग्नंट महिला आणि मधुमेह, कर्करोग, थायरॉईड हे आजार असलेल्या पेशंट्सनी, त्वचेची अॅलर्जी असणाऱ्यांनी तसंच कुठलेही वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसारच बटर कॉफीचं सेवन करावं. त्यामुळे तुम्हीही वजन कमी करत असाल तर ही बटर कॉफी घेऊ शकता पण काही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका.