Is It Safe To Use Ear Cotton Buds : सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याच कानात धूळ, हवा, पाणी आणि मातीमुळे कानात घाण जमा होत असते. ती घाण नैसर्गिकरीत्या साफ होत असते. जर ती घाण साफ झाली नाही किंवा त्यामुळे कान दुखू लागला; तसेच ऐकण्यास कमी येऊ लागले, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. काही जण कानातील मळ काढण्यासाठी माचीसची काडी, कान कोरणे आणि इअर बडचा वापर करीत असतात. यामुळे कानातील मळ आत ढकलला जातो. काहींना कानात इजा होऊन त्या ठिकाणी जखम होते. त्यामुळे कान, नाक आणि घशाचे डॉक्टर कधी अशा पद्धतीने इअर बड वापरू नये, असे रुग्णांना सांगत असतात.
इअर बड किंवा तत्सम गोष्टी कान साफ करण्यासाठी वापरल्यामुळे इजा झाल्याच्या अनेक घटना घडतात. असे अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे इअर बड किंवा त्यासारख्या कोणत्याच गोष्टी कान साफ करण्यासाठी वापर करू नये, असा सल्ला देतो. - डॉ. शशिकांत म्हशाळ, प्राध्यापक, कान-नाक-घसा विभाग, कूपर रुग्णालय
कान साफ कसा करावा?
नैसर्गिकरीत्या कान साफ होत असतात. तसेच जर काही घाण कानाबाहेर येत असेल तर बोटाने सहज ती अंघोळीच्या वेळी काढावी. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा वापर करू नये. काही अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवावे. ते शास्त्रीय पद्धतीने कान साफ करून देऊन शकतील.
मळ जातो आत -
वैद्यकीय तज्ज्ञ इअर बडचा वापर करू नये, असे कायम सांगत असतात. कारण यामुळे फायदे होण्याचे तोटे अधिक आहेत. कारण ज्यावेळी इअर बड कानातील मळ साफ करण्यासाठी कानात टाकता त्यावेळी तो मळ बाहेर येण्याऐवजी आतमध्ये ढकलला जातो. तसेच त्यावेळी कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध आवाज येणे...
१) सातत्याने कानावर जोरदार आवाज सातत्याने पडल्यामुळे कमी ऐकू येण्याच्या तक्रारी जाणवतात.
२) तसेच त्यामुळे काहीवेळ कानात सतत कुणीतरी गुणगुणत असल्याचा आवाज येतो. यावेळी डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार करणे गरजेचे असते.
डॉक्टरांना कधी भेटावे?
१) कानाला खाज येणे : काही कारणांमुळे कानाला खाज येते, त्यावेळी अनेकजण बोट टाकून खाजवायचा प्रयत्न करतात; मात्र अशावेळी बोटाच्या नखांमुळेसुद्धा इजा होण्याची शक्यता असते. खाज थांबत नसेल तर डॉक्टरांना दाखवावे.
२) कान दुखणे : कानामध्ये काही वैद्यकीय कारणामुळे वेदना होत असतात. त्याचे कारण शोधून डॉक्टर त्यावर उपाय करीत असतात. काहीवेळा दाताच्या दुखण्यामुळेसुद्धा कानात वेदना होतात.