सणवार असतील किंवा पार्टीमध्ये जेवण झालं, की काहीतरी डेझर्ट म्हणून गोड (Sweet) हवंच. सामान्यतः गोडाचा कोणताही पदार्थ सगळ्यात शेवटी खाल्ला जातो. आईस्क्रीम, मस्तानी, पुडिंग किंवा कोणत्याही प्रकारचं डेझर्ट हे शेवटी खाण्यालाच सर्वांची पसंती असते. आपली आवड आणि त्याची शरीराला असणारी गरज तसंच त्याचा शरीरावर होणारा परिणाम सारखेच असतील असं नाही. मग गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खावा की सुरवातीला? याबाबतच आपण या बातमीत आपण जाणून घेणार आहोत.
सण-समारंभांचं कोणतंही जेवण गोडाशिवाय पूर्ण होत नाही. बरेचदा रात्री जागरण करतानाही गोड खाण्याची तीव्र इच्छा (Sweet Cravings) होते. अशावेळी एखादं फळ खाण्यापेक्षा कायमच चॉकलेट, आईस्क्रीम, केक किंवा तत्सम गोड पदार्थांना प्राधान्य दिलं जातं. त्याचं कारण म्हणजे गोड अर्थात साखर (Sugar) खाल्याने मेंदू उत्तेजित होतो आणि त्यात डोपामाईन नावाचं रसायन स्रवतं. त्यामुळे रात्री-अपरात्री उठून चॉकलेटसारखे गोड पदार्थ खाण्याची इच्छा अनेकांना होते, पण जेवणानंतर किंवा रात्री उठून गोड खाण्याची ही सवय तब्येतीसाठी फारशी चांगली नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. याचे शरीरावर दूरगामी परिणाम दिसू शकतात. गोड पदार्थांमधून शरीरात जाणारी जास्तीची साखर हृदयासाठी घातक ठरू शकते. लठ्ठपणा, रक्तवाहिन्यांमधील जळजळ असे हृदयावर (Heart Disease) ताण येईल असे आजार यामुळे निर्माण होऊ शकतात. जेवणातील जास्तीच्या साखरेमुळे हृदयाच्या धमन्यांचे आजार होऊन मृत्युही ओढावण्याची शक्यता असते.
आयुर्वेदामध्ये अनेक रोग व आजारांवर औषधं सांगण्यात आली आहे. तसंच आजार होऊ नयेत म्हणून अनेक प्रतिबंधात्मक उपाय व दिनचर्येबाबतही अनेक चांगल्या सूचना आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत. आधुनिक वैद्यक शास्रातील सध्याचं संशोधन आणि आयुर्वेदानुसार कोणताही गोड पदार्थ जेवणाच्या आधी खावा. आयुर्वेदामध्ये त्यामागची काही कारणंही सांगितली आहेत.
रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्यास अन्नाचं विघटन होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे अर्थातच अन्नपचन (Digestion) लवकर होत नाही. त्यामुळे जेवणानंतर गोड खाण्यापेक्षा जेवणाआधी खाल्लं पाहिजे. तसं केल्याने जेवण पचण्यासाठी आवश्यक अशा लाळग्रंथींच्या स्त्रवण्यासाठी मदत होते व पुढील अन्न पचनाची प्रक्रिया सोपी होते. हेच जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनप्रक्रिया खूप वेळ चालू राहते. त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जेवणाआधी गोड खाल्ल्यामुळे चवीचं ज्ञान देणाऱ्या ग्रंथी उत्तेजित होऊन त्यामुळे पुढच्या जेवणाचा चांगल्याप्रकारे आस्वाद घेता येऊ शकतो. शेवटी गोड खाल्ल्यामुळे पोटातील जठराग्नी थंडावतो व पचनासंबंधीच्या सर्व क्रिया मंदावतात. यामुळे शरीरातील आम्ल वाढून जेवण आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. यातूनच मग गॅसेस, गुठळ्या होणं असेही प्रकार सुरू होतात.
खरं तर कृत्रिम साखर शरीरासाठी फार चांगली नसते. त्यात ती पदार्थात वरून मिसळून खाल्ली तर अधिक समस्या निर्माण करते. कर्बोदके असलेल्या सर्व पदार्थांमध्ये साखर असते. धान्य, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये साखर असतेच. त्यामुळे ज्यात नैसर्गिकरित्या साखर असेल, अशी फळं, धान्य खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. फळ, भाज्यांमधील फायबर, काही महत्त्वाची जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स तसंच दुग्धजन्य पदार्थांमधील कॅल्शिअम व प्रोटीन्स शरीराला साखरेसोबतच इतरही महत्त्वाची पोषणमूल्यं देतात. त्यामुळे शरीराला सतत उर्जेचा (Power) पुरवठा सुरू राहतो. त्यामुळे अशाप्रकारे वनस्पतीजन्य पदार्थांतील म्हणजेच नैसर्गिक साखर शरीरासाठी घातक ठरत नाही.
एकूणच जेवणानंतर गोड खाण्यापेक्षा जेवणाआधी गोड पदार्थ खाणं केव्हाही उत्तम ठरू शकतं असं आयुर्वेदतज्ज्ञ आणि आधुनिक आरोग्यतज्ज्ञांचंही मत आहे. त्यामुळे गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल व आरोग्यही उत्तम राहील.