निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. तुम्हीही हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी पीत असाल. पण तुम्ही देखील रात्री दीर्गकाळ ठेवलेलं पाणी पिता का? अनेकदा रात्री ठेवलेलं पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. रात्री ठेवलेल्या पाण्याने आजारी पडतात असंही तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेल..मात्र हे खरं आहे का? यामागे नेमकं कारण काय हे आज तुम्हाला सांगणार आहोत. आहार तज्ज्ञ हरि लक्ष्मी, मदरहुड हॉस्पिटल, अलवरपेट, चेन्नई यांनी हेल्थशॉट्स या वेबसाईटला ही माहिती दिली आहे.
रात्रीचं ठेवलेलं पाणी पिणं योग्य?अनेक लोकांना सवय असते की, झोपेत तहान लागली तर बाजूला एक ग्लास पाणी ठेवून देतात. मात्र हे पाणी पिणं कितपत सुरक्षित आहे? तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या प्रश्नाचं उत्तर पाणी कसं साठवलं जातं यावर अवलंबून आहे. वातावरणात धुळीचे कण असल्याने पाण्याचे ग्लास रात्रभर उघडे ठेवल्यास ते दूषित होतं. जर हे पाणी व्यवस्थित झाकलेलं असेल तर ते पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे.
'शिळं पाणी' असतं का?रात्रभर ठेवलेल्या पाण्याची कधी तुम्ही चव घेतली आहे का? या पाण्याला पूर्वीसारखी चव येत नाही. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, हवेतील कार्बन डाय ऑक्साईड पाण्यात मिसळणं हे यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पीएच पातळी कमी होते.
पाणी सुरक्षित ठेवण्याची योग्य पद्धत?पाणी साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कंटेनरमध्ये साठवणं. पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कटाक्षाने टाळावा. त्यात अनेकदा विषारी पदार्थ असतात. पाणी साठवताना भांडी किंवा बाटल्या चांगल्या प्रकारे धुवा, कारण याचा वापर केल्यानंतर दुर्गंधी येण्याची शक्यता असते.