- माधुरी पेठकर. रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे हा विचार आपल्या आजीपासून आईपर्यंत सर्वच सांगतात. हा विचार पटतोही. पण वळत मात्र नाही. कारण काहीही करा सकाळी लवकर जाग येत नाही ती नाहीच. केवळ सकाळी लवकर उठता येत नाही म्हणून मनात ठरवलेले कित्येक चांगले संकल्प तडीस जात नाही. वाचायचं असतं, व्यायाम करायच असतो, दिवसभरात जास्तीत जास्त कामं उरकायची असतात. पण हे लवकर उठणंच होत नाही. त्यामुळे सर्व कामं रखडतात. संपूर्ण दिवस जर ऊर्जेनं आणि उत्साहानं काम करायचं असेल तर सकाळची उठण्याची वेळ ( लवकरची) ती पाळायलाच हवी. ती पाळ्णं होत नसेल तर काही गोष्टी करून पाहायला हव्यात. झोपेला शिस्त लावून, उठण्याच्या संबंधातले काही नियम पाळले तर पहाटे लवकर उठणं हे कोणाहीसाठी अशक्यप्राय कधीच होणार नाही.
लवकर उठण्यासाठी हे करून पाहा!1. लवकर उठण्याचं लक्ष ठरवा. आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कशासाठी लवकर उठायचं हेच जर माहित नसेल तर मग कितीही आराम झालेला असला तरी आपण अंथरूणातून लवकर उठत नाही. यासाठी सकाळी लवकर उठून करावयाची कामं निश्चित करा. वाचन, व्यायाम, चालायला जाणं यासारखी काही कामं जर आपण स्वत:साठी काढून ठेवली तर लवकर उठण्याची इच्छा होते. 2. रात्री लवकर झोपलं की पहाटे लवकर उठलं तरी झोप पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होत नाही. पण रात्री जेवल्यानंतर उशिरा कॉफी, चहा पिण्याची सवय असेल, सिगारेट ओढण्याची किंवा रात्री ड्रिंक्स घेण्याची सवय असेल तर रात्री उशिरा झोप येते आणि सकाळी उशिरा जाग येते. पहाटे लवकर उठण्याची सवय लावायची असल्यास या सवयी आधी सोडायला हव्यात. शिवाय रात्री उशिरापर्यंत टी.व्ही पाहाणं, फोनवर, कम्प्युटरवर गेम खेळणं यामुळेही पहाटे लवकर जाग येत नाही. कारण या गोष्टींमुळे मेंदू उत्तेजित होतो. आणि झोप येण्याची रसायनं त्यातून लवकर स्त्रवत नाहीत. 3. रोज सकाळी साडेसात आठला उठायची सवय असेल तर दुसऱ्या दिवशी लगेच पहाटे पाचला उठायला कोणालाच जमणार नाही. सकाळी पाचला उठणं हे आपलं उठण्याचं लक्ष असेल तर हळूहळू या लक्षापर्यंत पोहोचावं. आठवडा किंवा पंधरा दिवसाचा वेळ घ्यावा. रोज नहेमीपेक्षा अर्धा तास लवकर उठण्याची सवय लावावी. यातून पहाटे पाचच लक्ष गाठलं जातं. 4. लवकर उठून करावयाची कामं आणि त्यासाठी लवकर उठणं हे आपल्या मित्र मैत्रिणींशी किंवा घरातल्यांशी शेअर करावं. कारण दुसऱ्या दिवशी केलं का हे काम, झालं का लवकर उठणं असे प्रश्न तेच विचारू शकतात. यांना आपल्याला उत्तरं द्यायची आहे केवळ या कारणाच्या दडपणामुळेही सकाळी लवकर उठून आपण ठरवलेली कामं करण्यावर भर देतो. 5 लवकर जाग आली नाही की त्याचं खापर आपण आदल्या रात्रीच्या उशिरा झोपण्यावर फोडतो. पण लवकर उठ्णं हे लक्ष गाठायचं असेल तर खापर फोडणं सोडून देवून मुळावरच घाव घालायला हवा. आपण रात्री का जागतो? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारावा. आपल्या सवयी आपोआप बाहेर येतील. रात्री उशिरा जेवणं, रात्री उशिरापर्यंत काम करत राहाणं, रात्री उशिरा व्यायाम करणं ही कारणं आली की आपोआप आपली दिनचर्या बदलावी असं आतूनच उत्तर येतं. अनेकजण उशिरा रात्री व्यायाम करतात. पण त्यामुळे रात्री लवकर झोप येत नाही हेही खरं. रात्री लवकर झोप येत नाही ही तक्रार असणाऱ्यांनी आपण रात्री उशिरा व्यायाम करत नाही ना हे कारण तपासून पाहावं.
6. रात्री उशिरापर्यंत जागून काम केल्यानं जास्त कामं होतात असं नाही. उलट त्याचा दुसऱ्या दिवशीच्या कामांवर परिणाम होतो. दुसऱ्या दिवशीच्या कामांवर रात्रीच्या जागरणाची सावली पडते. काम करताना झोप येते. आपण आपल्या पूर्ण ऊर्जेनं काम करत नाही. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून कामाला लागलं की जास्त कामं होतात. सकाळी थकल्यासारखं न वाटता प्रसन्न आणि स्फूर्तीदायी वाटतं. 7. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जी कामं ठरवली आहे ती काही केल्या सकाळी लवकर उठून व्हायलाच हवी असं स्वत:लाच सांगायला हवं. स्वत:ला स्वत:च कम्पलशन केलं, आपण स्वत:लाच प्रश्न विचारायला लागलो की जबाबदारी आणखी वाढते आणि ठरवलेलं काम पूर्ण होतं. सकाळी लवकर उठण्याच्या बाबतीत हीच स्वयंशिस्त जास्त महत्त्वाची असते. 8. गजर लावून सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. अनेकजणं उशिरा जाग येण्याची कारणं म्हणून अलार्म वाजला नाही, अलार्म उशिरा झाला म्हणून उशिरा जाग आली अशी कारणं देतात. म्हणून आधी अलार्म लावून लवकर उठण्याची सवय लावावी. काहीजण अलार्म लावतात, अलार्म वाजला की उठून बंद करतात पण परत झोपतात. त्यांनी काही वेळाच्या फरकानं दोन ते तीन अर्लाम लावावेत. एकदा का लवकर उठण्याची सवय लागली की नंतर नंतर या अलार्मचीही गरज राहात नाही.
9 रात्री झोपताना आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे असं सांगा. लवकर उठण्यासाठी स्वत: स्वत:शी बोलून स्वत:ला तयार करा. किंवा ज्या लोकांना पहाटे लवकर उठून काम करण्याची सवय आहे एकदा त्यांच्याशी त्यांच्या दिनचर्येविषयी, लवकर उठण्याच्या सवयीविषयी बोला. यामुळेही लवकर उठण्याच्या इच्छेला बूस्ट मिळतो. 10. रात्री झोपायला जाण्याआधी ध्यानधारणा करावी. ध्यानधारणेनं मेंदू शांत होतो. डोक्यातला गोंधळ हटून मन स्थिर होण्यास मदत होते. ध्यानधारणेनं शांत झोप येण्यास मदत होते. पडल्या पडल्या झोप लागते. झोप यामुळे पूर्ण होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा संकल्प या ध्यानधारणेनंही पूर्णत्वास जाऊ शकतो.