सध्या वातावरणामध्ये बदल होत असून त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. फक्त शरीरावरच नाही तर याचा आपल्या त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. अनेक आजार होतात, त्वचा कोरडी पडते त्याचप्रमाणे केसांमध्ये कोंडा होण्यासोबतच इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच सर्वांना होणारी एक कॉमन समस्या म्हणजे डोक्यात खाज येणं. जाणून घेऊयात काही घरगुती उपायांबाबत ज्याद्वारे तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
लिंबाचा रस
लिंबाचा रस डोक्याच्या त्वचेला लावा. 10 ते 15 मिनिटांनी धुवून टाका. त्यानंतर आधी पाण्याने केस धुवून पुन्हा शॅम्पूने केस धुवून घ्या. असं आठवड्यातून एक-दोन वेळा करा. डोक्याला येणाऱ्या खाज नाहीशी होण्यास मदत होईल.
खोबऱ्याचं तेल
डोक्याला किंवा डोक्याच्या त्वचेला येणाऱ्या खाजेवर खोबऱ्याचं तेल परफेक्ट मॉयश्चरायझर म्हणून काम करतं. एका वाटिमध्ये खोबऱ्याचं तेल घेऊन थोडसं गरम करा आणि डोक्याच्या त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे कोंड्यासोबतच खाजही दूर होईल.
बेकिंग सोडा
2 ते 3 टेबल स्पून बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-बॅक्टेरिअल आणि अॅन्टी-फंगल गुणधर्म असतात. जे डोक्याच्या त्वचेचा पीएच काउंट बॅलेन्स करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
कांद्याचा रस
एक कांदा घेऊन त्याचा रस काढून घ्या. कापसाच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर हा रस लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. त्यामुळे स्काल्प इन्फेक्शन आणि खाज नाहीशी होण्यास मदत होते.
सफरचंदाचे व्हिनेगर
एक चमचा सफरचंदाचं व्हिनेगर घेऊन त्यामध्ये चार चमचे पाणी मिक्स करा. तयार मिश्रण डोक्याच्या त्वचेला लावा. यामध्ये असलेलं मॅलिक अॅसिड अॅन्टीबॅक्टेरिअल असल्या कारणाने केसांच्या सर्व समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं.
टिप : प्रत्येकाची शारीरिक रचना वेगळी असते त्यामुळे वरील उपाय सर्वांना सूट होतील असे नाहीच. त्यामुळे वरील उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.