दिल्ली आणि उत्तर भारतात वायू प्रदूषणाचे (Air Pollution) संकट चिंताजनक आहे. हवेची ही स्थिती गंभीर आजार पसरवू शकते. दिल्ली आणि एनसीआरमधील हवेची गुणवत्ता (Air quality) पाहता अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. शाळा बंद केल्यात, कार्यालयात जाणाऱ्या लोकांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्ली एनसीआरच्या आकाशात धुक्याची (Smog) गडद चादर पसरली आहे. काही वर्षांपूर्वी जपानलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. परंतु, त्यानंतर हायड्रोजन इंधन (Hydrogen fuel) तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटावर बऱ्याच अंशी मात करण्यात यश आलं आहे.
जपानच्या हायड्रोजन इंधनावर आधारित तंत्रज्ञानामुळे दिल्ली-एनसीआर प्रदूषणापासून कायमची मुक्त होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ३ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. यादरम्यान सरकार जपानचे तंत्रज्ञान आणि त्याचा परिणाम यांचा अभ्यास करून न्यायालयाला अहवाल सादर करणार आहे.
जपान विद्यापीठाचे दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणावर संशोधनदोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर या तंत्रज्ञानाचे फायदे ठेवण्यात आले होते. तेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जपानच्या हायड्रोजन तंत्रज्ञानावर काही मुद्दे मांडले होते. यावर जपान विद्यापीठात संशोधन सुरू असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले होते.
जपान विद्यापीठाने दिल्ली-एनसीआर डोळ्यासमोर ठेवून संशोधन केले आहे. ते म्हणाले की, जपानचे संशोधन खास असून त्यामुळे दिल्ली-एनसीआरची प्रदूषणापासून कायमची सुटका होऊ शकते. जपान विद्यापीठात संशोधन करणारे संशोधक विश्वनाथ जोशी यांची त्यांनी न्यायालयाला ओळख करून दिली होती. हायड्रोजन आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येथील प्रदूषण दूर करता येईल, असे विश्वनाथ जोशी यांनी सांगितले होते.
जपानचे हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान काय आहे?जपानमध्ये प्रदूषणाची गंभीर समस्या होती. हायड्रोजन इंधनाच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यात जपानला यश आले आहे. आता हे हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान भारतात वापरण्याची चर्चा आहे. या तंत्रज्ञानामध्ये हायड्रोजन वायूचा वापर वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो.
हायड्रोजन इंधन वापरल्याने केवळ बायप्रोडक्ट म्हणून पाणी तयार होते. हायड्रोजन इंधन कोणत्याही विषारी वायूचे उत्सर्जन करत नाही. जपान आपल्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये हायड्रोजन वायूचा इंधन म्हणून वापर करतो. त्यामुळे तेथील प्रदूषणाची पातळी खूपच कमी झाली आहे. चीन आणि जर्मनीसारखे देशही प्रदूषणाचा सामना करण्यासाठी हायड्रोजन इंधन वापरत आहेत.
प्रदूषणाचा सामना करण्यासाठी जपानमध्ये अनेक प्रयोगहायड्रोजन इंधनाबाबत जपानमध्ये अनेक प्रयोग झाले. रिसर्च असोसिएशन फॉर हायड्रोजन सप्लाय अँड युटिलायझेशन टेक्नॉलॉजीच्या भागीदारीत, जपानच्या स्थानिक सरकारांनी हायड्रोजन शहरे बांधली. या शहरांमध्ये इंधन म्हणून हायड्रोजन वायूचा वापर केला जातो.
जपानमधील किटाक्युशू या शहराला हायड्रोजन शहर म्हणून घोषित करण्यात आले. या शहरात रहिवासी आणि औद्योगिक भागात हायड्रोजन वीज पुरवठा केला जातो. पाइपलाइनद्वारे थेट वीजपुरवठा केला जातो. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ही रणनीती इतकी प्रभावी होती की आता किटाक्युशू चीन, कंबोडिया आणि व्हिएतनाम सारख्या देशांना या धोरणाद्वारे प्रदूषणाचा सामना करण्यासाठी मदत करत आहे.
किटाक्युशूमध्ये प्रदूषणाबाबत लोकांना जागरूक करण्याचे कामही करण्यात आले. कामगार, कम्यूनिटी आणि कंपन्यांमध्ये प्रदूषणाला सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. जपानमधील आणखी एका शहराने प्रदूषणाचा सामना करण्यात यश मिळवले आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कावासाकी शहरात जपानचा सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला. या शहरात औद्योगिक लँडफिल साइट होती. जपानने हा सारा परिसर चकाचक केला. औद्योगिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा व्यवसाय येथे सुरू झाला. या सर्व उपायांनी जपानने आपले प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी केले आहे.