(Image Credit : inews.co.uk)
कॅन्सर हा शब्द ऐकला तरी हृदयाचे ठोके वाढतात. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना अनेक वैद्यकीय तपासण्या करण्याचा सल्ला देण्यात येतो. वारंवार करण्यात येणाऱ्या तपासण्यांमुळे कॅन्सर पीडित रूग्ण आणखी खचून जातात. परंतु आता या तपासण्या करणं अगदी सोपं होणार आहे. कारण आता फक्त 10 मिनिटांच्या एकाच तपासणीतून व्यक्ती कॅन्सर पीडित आहे की नाही हे समजणं शक्य होणार आहे. कॅन्सरसंदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही बाब सिद्ध करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅन्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनात त्यांना यश मिळालं आहे. संशोधकांनी एका अशा तपसणीचा शोध लावला आहे, ज्याचा वापर करुन फक्त दहाच मिनिटांमध्ये कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे, हे समजण्यास मदत होते. या तपासणीसाठी रूग्णाच्या रक्ताचा नमुना घेतला जातो. त्यानंतर मॉलिक्युल्सच्या पॅटर्नच्या तपासण्या करण्यात येतात. ज्याला मिथाइल ग्रुप असं म्हटलं जातं. शरीरात असणाऱ्या याच मॉलिक्युलपासून डीएनए तयार झालेलं असतं.
ही तपासणी 90 टक्के विश्वासार्ह
ही तपासणी करण्यासाठी रंग बदलणाऱ्या फ्लुइडचा वापर केला जातो. ज्यामुळे रक्तात असणाऱ्या घातक पेशींची ओळख होणं शक्य होतं. तसं पाहायला गेलं तर अद्यापही यासंदर्भात प्रयोग सुरू आहेत. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या 200 नमुन्यांची तपासणी केली असता याचा निकाल 90 टक्के तंतोतंत बरोबर सिद्ध झाला. या टेस्टमध्ये क्लिनिकल ट्रायल मार्फत आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच ही टेस्ट व्यावसायिक रूपात बाजारात उपलब्ध करण्यात येईल.
कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे होते निदान
नेचर कम्युनिकेशन्स नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ही टेस्ट क्वीन्सलॅन्ड टीमने केलेल्या एका संशोधनावर अवलंबून आहे. ज्यामध्ये कॅन्सर डीएनएमध्ये अस्तित्वात असणारे मॉलिक्युल्स ज्यांना मिथाइल ग्रुप म्हटलं जातं. हे नॉर्म डीएनएच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे दिसून येतात. युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅन्डच्या संशोधकांनी मिथाइल स्केपची तपासणी केल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की, मिथाइल स्केप हे प्रत्येक प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आढळून आले. सोबत प्रोस्टेट कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि लिम्फोमा कॅन्सरसाठी ही तपासणी उपयुक्त अशी ठरली आहे.
कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी फायदेशीर
मॅक्स डेकेयर ऑन्कोलॉजीचे सीनियर डायरेक्टर डॉ. पी. के जुलका यांनी सांगितले की, या टेस्टचं ह्युमन ट्रायल घेण्यात आल्यानंतर, ती 100 टक्के यशस्वी झाल्यासच रूग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सध्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी सस्पेक्टेड ट्यूमरची बॉयॉप्सी ही एकमेवच तपासणी उपलब्ध आहे. जर एखाद्या रूग्णाला त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं कॅन्सरसंबंधित लक्षण किंवा गाठ आढळून आल्यास डॉक्टर त्यानुसार तपासणी करण्याचा सल्ला देतात.
सध्या सर्वाइवल रेट फक्त 20 टक्के आहे
मॅक्समधील डॉक्टर जुलका यांनी सांगितले की, बायोप्सी केल्यानंतर रिपोर्ट येण्यासाठी 1 ते 2 आठवड्यांचा कालावधी लागतो. कॅन्सरचे निदान होण्यास लागणाऱ्या वेळामुळे भारतात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी फार वेळ लागतोच पण अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. कॅन्सरच्या जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये वाचण्याची शक्यता केवळ 20 टक्केच आहे. कारण जास्तीत जास्त रूग्ण त्यावेळी डॉक्टरांकडे जातात जेव्हा त्यांचा कॅन्सर अॅडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये पोहोचतो. अशातच जर कॅन्सरचे निदान सुरूवातीलाच झाले तर जवळपास 80 टक्के रूग्णांचा जीव वाचवणं शक्य होईल.