बॉलिवूड अभिनेते कदर खान यांचे कॅनडामध्ये निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. मीडिया रिपोर्टनुसार, कादर खान बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना प्रोग्रेसिव सुपरन्यूक्लियर पाल्सी नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून ते या आजारावर उपचार घेत होते. परंतु त्याच आजाराशी लढा देता देता त्यांची प्राणज्योत मालवली आणि सिनेसृष्टीतील एक तारा निखळला.
काय आहे प्रोग्रेसिव सुपरन्यूक्लियर पाल्सी?
प्रोग्रेसिव सुपरन्यूक्लियर पाल्सी एक असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीचं शारीरिक संतुलन बिघडतं. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला बसताना , उठताना, चालताना किंवा बोलताना त्रास होतो. त्याचबरोबर या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो आणि कालांतराने ती व्यक्ती छोट्या गोष्टी विसरू लागते. या आजाराने ग्रस्त असलेल्या कादर खान यांनाही या सर्व समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेकदा ते छोट्या छोट्या गोष्टी विसरतं असतं. तर अनेकदा माणसांना ओळखणंही त्यांना शक्य होत नसे.
प्रोग्रेसिव सुपरन्यूक्लियर पाल्सीची कारणं :
प्रोग्रेसिव सुपरन्यूक्लियर पाल्सी एक असा आजार आहे ज्यामुळे व्यक्तीला उठताना, बसताना त्रास होतोच पण डोळ्यांची हालचाल करतानाही त्यांना त्रास होतो. हा आजार सर्वात आधी मेंदूच्या पेशींना आपला शिकार करतो. तसेच शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मेंदूच्या महत्त्वाच्या पेशींना डॅमेज करतो. त्यामुळे शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होऊन त्यांचं काम ते व्यवस्थित करू शकत नाहीत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या आजाराची कारण नैसर्गिक आहेत. अचानक मेंदूच्या पेशींची वाढ खुंटण किंवा त्या डॅमेज होणं यांपैकी कोणत्याही कारणाने हा गंभीर आजार त्या व्यक्तीला होऊ शकतो. जर या आजाराकडे दुर्लक्ष केलं आणि त्याकडे योग्य उपचार केले नाही तर हा आजार गंभीर रुप धारण करू शकतो. परंतु या आजाराला केवळ काही स्टेजपर्यंत रोखणं शक्य होतं. अद्याप हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकेल अशी उपचार पद्धती अस्तित्वात आलेली नाही.
प्रोग्रेसिव सुपरन्यूक्लियर पाल्सीची लक्षणं :
- अचानक अंग आखडणं
- चालता चालता पडणं
- बोलताना त्रास होणं
- अन्न चावताना आणि गिळताना त्रास होणं
- झोपेच्या अनेक समस्या उद्भवणं
- डोळ्यांच्या समस्यांचा सामना करणं
- उगाचच हसणं किंवा रडणं
- डिप्रेशन
- सतत अस्वस्थ वाटणं
- चेहऱ्याचे हावभाव अचानक बदलणं
कादर खान यांनाही करावा लागला होता या समस्यांचा सामना :
मीडिया रिपोर्टनुसार, कादर खान यांना अनेक दिवसांपासून श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना मागील काही दिवसांपासून वेंटीलेटरवर (BIPAP) ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. 2015मध्ये प्रदर्शित झालेला 'दिमाग का दही' हा कादर खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला.