केरळमध्ये दोन जणांच्या मृत्यूनंतर निपाह व्हायरसचा प्रसार होण्याची भीती पुन्हा एकदा वाढली आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये तापाने दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर निपाह व्हायरस कारणीभूत असण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यानंतर संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका मृताच्या नातेवाईकाला डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवलं आहे. याची माहिती मिळताच राज्य सरकारने तातडीने कारवाई केली असून आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.
2018 मध्ये निपाह व्हायरसची 23 प्रकरणे आढळून आली होती आणि त्यामुळे 17 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. निपाह व्हायरस हा एक जेनेटिक व्हायरस आहे जो प्राण्यांपासून माणसांमध्ये प्रवेश करतो आणि नंतर माणसांमध्ये पसरतो. या व्हायरसचे नाव मलेशियातील एका गावाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे, जिथे पहिल्यांदा याची नोंद झाली होती. फ्लाइंग फॉक्स नावाच्या वटवाघळामुळे त्याचा प्रसार होतो. व्हायरसची लागण झालेल्या वटवाघळांमुळे हा संसर्ग माणसांमध्ये पसरतो.
जेव्हा ते प्राणी किंवा त्यांच्या लाळेच्या किंवा शरीरातील इतर द्रव्यांच्या संपर्कात येतात तेव्हा त्याचा प्रसार होण्याचा मोठा धोका असतो. एवढेच नाही तर कधी कधी त्यांनी खाल्लेली फळे खाल्ल्याने संसर्ग होण्याचा धोकाही निर्माण होतो. याची लागण झालेली व्यक्ती हा संसर्ग इतरांपर्यंत पसरवते. ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होणे ही याची लक्षणं आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, निपाह संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मृत्यू दर 40 ते 75 टक्के आहे.
WHO च्या म्हणण्यानुसार, निपाहसाठी सध्या कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संस्था यावर जोर देते की लोकांमध्ये निपाह संसर्ग कमी करण्याचा किंवा रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जागरूकता पसरवणे. हे सार्वजनिक शिक्षणाद्वारे हे केलं जाऊ शकतं जसं की लोकांना खाण्यापूर्वी फळं पूर्णपणे धुण्यास सांगणे आणि संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर खबरदारीचं पालन करणं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.